NASHIK | भुजबळांच्या बंगल्यावर कुणाची आहे नजर...?
ओबीसी नेते मंत्री छगन भुजबळ यांच्या "भुजबळ फार्म" या निवासस्थानावर ड्रोन कॅमेऱ्याद्वारे टेहळणी केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या ड्रोनद्वारे रेकी केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
लोकसभेच्या निवडणूकीसाठी नाशिक मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेले राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते मंत्री छगन भूजबळ यांच्या "भूजबळ फार्म" या निवास्थानावरून ऐन निवडणुकीच्या काळात ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून टेहळणी केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. हा ड्रोन कॅमेरा "भुजबळ फार्म" वरून शुक्रवारी रात्रीच्या सुमार उडवला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
दरम्यान, भुजबळांच्या बंगल्याची अशा पध्दतीने ड्रोन पाहणी करणे हे संशयास्पद असल्याचे वर्तवलं जात आहे. यासंदर्भात भुजबळांच्या निवासस्थानावरील कर्मचाऱ्यांकडून पोलीसांत कायदेशीर तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलीसांत दाखल केलेल्या तक्रारीची दखल घेत अंबड पोलीसांनी या फार्मची पाहणी केली. या फार्मच्या बाहेर आता संरक्षण म्हणून पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.
छगन भुजबळांच्या बंगल्यावर कुणाची नजर ?
छगन भुजबळांच्या या फार्मवर कुणाची नजर आहे आणि हा ड्रोन नेमका कुणाकडून उडविण्यात आला आहे याचं कारण अद्याप समोर आलं नाही. हा ड्रोन उडविण्यासाठी कुणी परवानगी घेतली होती का? या माहितीचा शोध घेणे सध्या सुरू आहे. राज्यात लोकसभेच्या निवडणुकांवरून आधीच वातावरण तापले आहे, अशातच भुजबळ यांच्या फार्मवरून ड्रोन कॅमेरा उडाल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. याप्रकरणी पुढील तपास पोलीस यंत्रणेकडून करण्यात येत आहे.
नाशिक लोकसभेची जागा अजित पवार गटाला मिळणार?
राज्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच, नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या जागेवरून महायुतीत जोरदार रस्सीखेच सुरू आहे. शिवसेना शिंदे गटाचे खासदार पुन्हा उमेदवारीसाठी आग्रही आहेत, तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून नाशिकच्या जागेसाठी जोर लावला जात आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघाची जागा ही अजित पवार गटाला मिळण्याची चर्चा आहे. उद्या छगन भुजबळ यांच्या उमेदवारीबाबत घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
भुजबळांच्या उमेदवारीविरोधात मराठा समाजाची भुमिका
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा समाजाच्या मनात भुजबळांविषयी प्रचंड असंतोष असल्यामुळे छगन भुजबळ यांनी लोकसभेची निवडणूक लढवल्यास त्यांच्याविरोधात उमेदवार उभा करण्याचा इशारा सकल मराठा समाजाकडून देण्यात आला आहे. नाशिक येते झालेल्या बैठकीत सकल मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी छगन भुजबळ यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.
दरम्यान, भुजबळांनी मराठ्यांचे हातपाय तोडण्याची भाषा केली आहे. राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे मराठ्यांना डिवचण्याचे काम करत आहेत. यामुळे राज्यातल्या ४८ मतदारसंघात महायुतीला यांचे चांगलेच परिणाम भोगावे लागतील, त्याचबरोबर भुजबळ यांच्या बाबतीत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन पुढील भुमिका जाहीर करणार असल्याचेही सकल मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने सांगण्यात आले आहे.