सिंधुदुर्गाचा तिढा सुटला : शिंदे सेनेची माघार, सामंतांमुळे नारायण राणेना संधी...
नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान बनवण्यासाठी मोठ्या मनाने किरण सामंत यांची माघार घेतली आहे. मोदीजींचा ४०० पार चा नारा साकार करणार - उदय सामंत यांची घोषणा;
अखेर रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचा तिढा सुटला आहे. भाजप समोर शिवसेना ( शिंदे गट ) तलवार म्यान केली आहे. शिवसेना उपनेते उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेऊन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा केला आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची उद्या शेवटची तारिख येऊन ठेपली असतांना मात्र या मतदारसंघासाठी उमेदवार ठरत नव्हता. या मतदारसंघावर शिवसेनेचे वर्चस्व असल्याने शिवसेनेचे नेते किरण सामंत यांना उमेदवारी मिळावी यासाठी शिवेसना आग्रही होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या कडे या मतदारसंघासाठी आग्रही मागणी केली होती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही हा तिढा सोडवण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न केले. मात्र पेच सुटत नसल्याने आणि कार्यकर्त्यांमधील संभ्रम वाढत चालल्याने अखेर सामंत कुटुंबियांनी या निवडणुकीतून स्वतःहून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबईतील मुक्तागिरी या निवासस्थानी बोलवलेल्या तातडीच्या पत्रकार परिषदेत शिवसेना उपनेते उदय सामंत आणि किरण सामंत यांनी आपली भूमिका मांडली. पत्रकारांशी बोलताना उदय सामंत म्हणाले की, मोठ्या मनाने यंदाच्या निवडणुकीतून आम्ही माघार घेत आहोत. महायुतीचे जे उमेदवार असतील त्यांच्या पाठीशी पूर्ण शक्तीने आम्ही उभे राहू. अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शब्दाचा मान राखून आम्ही हा निर्णय घेत आहोत. उमेदवारी अर्ज भरण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे, तरी सुद्धा हा तिढा सुटत नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये गोंधळाचं वातावरण राहू नये म्हणून आम्ही स्वतःहून हा निर्णय घेतला आहे.
उदय सामंत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, आदरणीय किरण सामंत यांनी कमळ चिन्हावर निवडणूक लढवावी असा प्रस्ताव ही आला होता, मात्र आम्ही तो नाकारला. शिवसेनेचा धनुष्यबाण घराघरात पोहोचलेला आहे. अजून उमेदवारी जाहीर झालेली नाही, त्यामुळे गोंधळ निर्माण होऊ नये यासाठी आम्ही स्वतःहून ही भूमिका घेतली आहे.
आम्ही या निवडणुकीतून माघार घेतली आहे, राजकारणातून नाही असं सांगतानाच किरण सामंत यांच्या राजकीय पुनर्वसनाबाबतच्या प्रश्नावर उत्तर देताना उदय सामंत म्हणाले की, आम्ही मोठ्या मनाने हा निर्णय घेतला आहे, कुठेतरी पुनर्वसन होईल वगैरे गोष्टींवर आम्ही काम करत नाही. किरण सामंत जी यांचे काम मोठं आहे, आणि आम्ही मोठ्या मनाने हा निर्णय घेतला आहे. किरण यांच्या नावाची चर्चा देशभर झाली, जर किरण यांनी हा निर्णय घेतला नसता तर हा तिढा अजूनही सुटला नसता.
देवेंद्र फडणवीस यांच्याशी माझ्या परिवाराचे जुने संबंध आहेत. ते प्रामाणिकपणे आमच्या पाठीशी आहेत. त्यांनी पुढाकार घेऊन अमित शहा साहेबांशीही चर्चा केली. माननीय मुख्यमंत्र्यांनीही याबाबत चर्चा केली. शिवसैनिकांमध्ये नाराजी असणे स्वाभाविक आहे, मात्र आता ती दूर करणे आमची जबाबदारी आहे. आदरणीय मोदीजी यांना ४०० पार जागा मिळवून द्यायच्या आहेत. त्यामुळे राजकारणात मन किती मोठं असावं याचा प्रत्यय आदरणीय किरणजी यांनी दिला आहे असं ही उदय सामंत यांनी सांगितले.
एकीकडे ज्येष्ठ चेहरा आणि दुसरीकडे नव्या दमाचा उमेदवार यात निर्णय घेत असताना जो पेच निर्माण झाला होता तो आम्ही मन मोठं केल्यामुळे सुटला आहे. नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे, त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत आणि आम्ही त्यांच्यासाठी एकदिलाने काम करू, मात्र या सर्वात प्रचारादरम्यान कोणी मिठाचा खडा टाकण्याचं काम करू नये अशी अपेक्षाही उदय सामंत यांनी व्यक्त केली आहे.
उमेदवारी देऊन पक्षाच्या नेत्यांनी विश्वास दाखवला त्याबद्दल नारायण राणे यांनी आभार मानले महायुती म्हणूंन मोदींना पुन्हा पंतप्रधान बनवण्यासाठी एकदिलाने कामं करू अर्ज दाखल करत आहोत
असं राणेनी म्हटलंय..