अटक - असामान्यांची व सामान्यांची...

नारायण राणे यांना झालेली अटक आणि सुटका... मात्र, अशा प्रकारे अनेक सामान्य लोकांना सरकारच्या धोरणाबाबत टीका केली आणि अटक झाली तर जामीन मिळतो का? जैतापूर प्रकल्प विरोधक मिलिंद देसाई यांना केलेल्या अटकेचा अनुभव सिविल इंजिनिअर सत्यजित चव्हाण यांनी मांडला आहे. नक्की वाचा आणि आपलं मत नक्की व्यक्त करा...;

Update: 2021-08-25 14:45 GMT

काल अटकेचा ड्रामा सर्वांनी पहिला… तेंव्हा आठवले...

जैतापूरच्या आंदोलनातील दिवस...

ऑक्टोबर २००९ ला NPCIL ची जीप काही सर्वे करायला माडबनच्या पठारावर आली, काही शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांनी त्या गाडीच्या काचा फोडल्या. प्रवीण गवाणकर घरी होते, ते बातमी आली म्हणून तसेच पहावयास निघाले. पोलिसांनी त्यांना अटक केली. धोंडगा नावाचा पोलीस ऑफिसर गावात बंदूक काढून, घरा घरात जाऊन धमकावत होता.

जे तोडफोडीत सामील नव्हते पण आंदोलनात सक्रिय होते, त्यांनाही अटक केली. ७ दिवस त्यांना कोठडीत ठेवले, लांज्याला. मग ४ एक वर्ष या केसच्या तारखा पडत राहिल्या. कधी राजापूर, कधी रत्नागिरी... कोर्टात जावे लागायचे. मग निर्दोष सोडून दिले कोर्टाने.

फेब्रुवारी २०११ तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण जैतापुर भागातील माणेश्वर मंदिरात जाहीर सभा घेत होते. मंत्री नारायण राणे, खासदार निलेश राणे, माणिकराव ठाकरे, हुसेन दलवाई आदी नेते व्यासपीठावर होते. जैतापुर विरोधकांची भाषणे सुरू होती. त्यावेळचे प्रकल्प विरोधक मिलिंद देसाई यांनी "सरकारला शरम वाटत नाही" असे उद्गार काढताच गदारोळ झाला. मिलिंद देसाई यांनी भाषण अर्धवट सोडले. नारायण राणे यांनी भाषण बंद करण्यासाठी दम भरला.

त्याच रात्री दीड वाजता मिलिंद देसाई यांना पोलिसांनी घरी जाऊन अटक केली. संबंध नसलेल्या गुन्ह्याचे आरोप लावले होते. ९ दिवस कोठडीत ठेवले. त्या नंतर ५ वर्षे कोर्टाच्या फेऱ्या रत्नागिरीला मारायला लागल्या.

२०१२ साल असेल. पावस येथील माऊली माहेर येथे जैतापुर आंदोलकांची छोटी सभा पुढची दिशा ठरविण्यासाठी ठरली होती. आम्हीही मुंबईहून निघालो होतो. जसा हातखंबा पार केला पोलिसांची गाडी पिच्छा करू लागली. आम्हाला पुढे ओव्हरटेक करून थांबविण्यात आले. आम्हा सर्वांची नावे त्यांच्याकडे होती.

महामार्गावरील रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी ६ तासाहून अधिक काळ आम्हाला डिटेन केले. मिटींगला जाऊ न देण्याचे आदेश आहेत, असे त्यांनी सांगितले. संध्याकाळी आता तुम्ही मुंबईला परत जा सांगितले. मुंबईकडे निघाल्यावर संगमेशवर पर्यंत पोलिसांची गाडी मागे होती, आम्ही नक्कीच परत जात आहोत का? हे बघायला.

एप्रिल २०११ साली तारापूर- जैतापुर अणूप्रकल्प विरोधी यात्रा निघाली. ज्या दिवशी यात्रा निघणार त्याच सकाळी तारापूर येथेच स्वतः विश्वास नांगरे पाटील यांनी येऊन यात्रा नका काढू म्हणून सांगितले. पण सर्वांनी पक्का निराधार केला होता. ४ बसेस दोनशेहून अधिक संपूर्ण भारतातून आलेले कार्यकर्ते यांनी ठरवले, यात्रा काढायचीच. तारापूर नंतर पुढचा स्टॉप ठाणे होता. कामगार नेते राजन राजे यांनी ४ वाजता सभा आयोजित केली होती.


पोलिसांनी पश्चिम द्रुतगती महामार्गावर बसेस अडविल्या. बस चालकाला धमकी दिली. तो बस सोडून निघून गेला. मिळेल त्या वाहनाने सर्व ठाण्याला पोहचले. सभा ८ वाजता सुरू झाली. रात्र युसूफ मेहेरअली सेंटर, तारा(पनवेल) येथे काढली. पोलिसांनी यांना इथे थांबवू नका म्हणून विश्वस्थाना सांगत होते. पण मुख्य विश्वस्त जी जी पारीख यांनी त्यांना भीक घातली नाही.

पुढचा स्टॉप सकाळी पेण होता. पोलिसांनी सभेला परवानगी नाकारली. आम्ही जेथे थांबलो तेथे पोलीस बंदोबस्त ठेवला. कुणालाही गेट बाहेर जाऊ दिले जात नव्हते. दुपार नंतर हळू हळू सगळे निसटले. संध्याकाळी महाड येथे रस्त्यावर पथनाट्य करत असताना पोलिसांनी अटक केली. रात्रीपर्यंत डिटेन करून ठेवले. केसेस झाल्या. त्याच्या तारखा पुढील ६ वर्ष पडतच होत्या.

मी व मित्र पनवेलहूनच बाईक ने रत्नागिरीत पोहचलो होतो. हायवेवर प्रत्येक चेक नाक्याला बंदोबस्त होता. गोरखपूर, बर्गी- चटका, दिल्ली आदी ठिकाण हुन आलेले मुख्य नेते ट्रॅक्स ने रात्री रत्नागिरीला पोहचले. अभिजित हेगशेटे यांचेकडे थांबले. मध्यरात्री नंतर ते ट्रॅक्सने साखरी नाटे येथे पोहचले. सकाळी साखरी नाट्यात सभा झाली. माडबन-साखरी नाटे वासी उपस्थित होते. सर्व अडथळे पार पाडून यात्रा पूर्ण झाली.

( अशा बऱ्याच घटना आहेत, वर केवळ सॅम्पल दिले आहेत.)

हे सगळे कुणाच्या आदेशावरून होत होते?

पृथ्वीराज चव्हाणांनी कुणाला आंदोलन मोडून काढण्याची सुपारी दिली होती? काल तेच स्वतःला अटक झाली म्हणून आक्रोश करत असताना दिसले. खरंच आम्ही सामान्य होतो म्हणून दडपशाही केली. ते तर असमान्य आहेत... कोकणवासीयांनो तुम्हीच ठरवा!

सत्यजित चव्हाण

(लेखक : सत्यजित चव्हाण हे शिक्षणाने सिविल इंजिनिअर आहेत.त्यांचा स्वतःचा इमारत रिपेअरचा व्यवसाय आहे. कोकणातल्या गावाकडची त्यांना ओढ असल्याने त्यांनी कोकणातील निसर्गाचा अभ्यास केला. पुण्याच्या इकोलॉजीकल सोसायटी मधून त्यानी निसर्गाचे शिक्षण घेतले. गेली 10 वर्ष ते जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प विरोधाच्या लढ्यात अग्रभागी आहेत, व लढ्याच्या समितीचे अध्यक्षही आहेत. रद्द झालेल्या नाणार परिसरातील रिफायनरी विरोधाची सुरुवात यांनी काही मित्राला सोबत घेऊन केली. पुढे त्याचे मोठ्या आंदोलनात रूपांतर होऊन रिफायनरी हद्दपार झाली.अंबोळगड किनाऱ्यावरील प्रस्तावित औदयोगिक क्षेत्र व बंदर प्रकल्प यांनी व यांच्या सहकाऱ्यांच्या ४ वर्षे अथक प्रयत्नाने हद्दपार झाला.कोकणातील जैव विविधता नोंदणी रजिस्टर करण्याच्या प्रयत्नात हे आहेत.(PEOPLS BIODIVERSITY RAGISTER) तसेच लोटे -खेड येतील प्रदूषणाबाबत काम करून पूर्ण परिसर चांगल्या हवेचा व पाण्याचा करण्यासाठी हे आता लक्ष घालीत आहेत.)

Tags:    

Similar News