किरीट सोमय्या यांना न्यायालयाचे समन्स, अतुल लोंढे यांनी ठोकला मानहानीचा दावा

किरीट सोमय्या यांना न्यायालयाचे समन्स, अतुल लोंढे यांनी ठोकला मानहानीचा दावा Nagpur Civil Court Summons Kirit Somaiya;

Update: 2021-11-10 15:20 GMT

महाविकास आघाडीवर सातत्याने आपली तोफ डागणाऱ्या किरिट सोमय्या यांच्या विरोधात कॉंग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर आता किरिट सोमय्या यांना नागपूरच्या दिवाणी न्यायालयाने समन्स बजावला आहे.

किरिट सोमय्या यांनी महाविकास आघाडी संदर्भात भ्रष्टाचाराचा आरोप केला होता. त्यामध्ये त्यांनी

'राज्य सरकार वसुली करते, हा वसुलीचा पैसा तिन्ही पक्षांमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीला प्रत्येकी ४० टक्के तर काँग्रेसला २० टक्के असा विभागला जातो'

असा आरोप सोमय्या यांनी केला होता.

यावर अतुल लोंढे यांनी वकील सतीश उके यांच्यामार्फत किरिट सोमय्या यांच्याविरुद्ध दिवाणी आणि फौजदारी अशा दोन याचिका दाखल केल्या आहेत. त्यावर आज न्यायालयाने किरिट सोमय्या यांना समन्स बजावलं आहे. या प्रकरणाची सुनावणी 20 नोव्हेंबर ला होणार आहे. आता या प्रकरणात सोमय्या यांना स्वत: हजर राहून किंवा वकिलामार्फत न्यायालयात आपली बाजू मांडावी लागणार आहे.

लोंढे यांच्या मते किरिट सोमय्या यांचेकडे कोणतेही पुरावे नसताना ते आरोपांची राळ उडवून काँग्रेसची बदनामी करतात. त्यामुळं त्यांच्यावर न्यायालयाने १ रुपयांचा दंड ठोठावा. अशी मागणी त्यांनी वकिलामार्फत न्यायालयाकडे केली आहे.

लोंढे यांनी दाखल केलेल्या याचिकेनुसार, सतत खोट्या आरोपांची राळ उडवून महाविकास आघाडीच्या नेत्यांना बदनाम करण्याचे काम सोमय्या करीत आहेत. टीका करताना त्यांचा तोल ढळतो. यामुळे काँग्रेस पक्षाची नाहक बदनामी होत आहे. स्वतःच तपास अधिकारी व स्वतःच न्यायाधीश असल्याच्या आविर्भावात ते बोलतात. मात्र त्यांच्याकडे कोणतेही पुरावे नाहीत. त्यामुळे काँग्रेसची बदनामी केल्याने त्याच्यावर फौजदारी कारवाई करण्यात यावी तसेच मानहानी केल्यामुळे १ रुपयांचा दंड ठोठावण्यात यावा, अशी मागणी या याचिकेद्वारे करण्यात आली आहे.

Tags:    

Similar News