राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि राज्य सरकार यांच्यात पुन्हा एकदा नव्याने संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि सरकारमध्ये सुरू झालेला संघर्ष आता आणखी तीव्र झाला आहे. राज्यपाल राज्यात दोन सत्ता केंद्र निर्माण करत असून सरकारच्या कामात हस्तक्षेप करत असल्याचा आरोप अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे.
राज्यापाल भगतसिंह कोश्यारी हे नांदेड, हिंगोली आणि परभणीच्या दौ-यावर जात आहेत. नांदेड येथील विद्यापीठाच्या कार्यक्रमाबरोबरच ते जिल्हाधिकाऱ्यां बरोबर आढावा बैठक घेणार आहेत. त्याचबरोबर ते हिंगोली आणि परभणीतील जिल्हाधिकारी यांच्याबरोबरही सुमारे दीड तास आढावा बैठक घेणार आहेत. पण त्यांची ही कृती घटनाबाह्य आहे असं नवाब मलिक यांनी सांगितलं. "जर एखादी माहिती राज्यपालांना हवी असेल तर त्यांनी मुख्य सचिवांकडून मागवली पाहिजे पण असे न करता ते आपल्या अधिकाराचा गैरवापर करत आहेत." असा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. या बाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत नाराजी व्यक्त करण्यात आली. मुख्य सचिव याबाबत राज्यपालांना माहीती देतील असंही नवाब मलिक यांनी म्हटले आहे. कोविडच्या काळात राज्यपाल माहिती घेत होते पण राज्य सरकारने केंद्राकडे तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर ते बंद झाले होते पण आता पुन्हा राज्यपालांनी तसाच प्रकार सुरू केल्याचे नवाब मलिक यांनी म्हटले आहे.