राज्यात निवडणूकीच्या मतदानाचा पहिला टप्पा पार पडल्यानंतर इतर भागात राजकीय प्रचार सभेला वेग आला आहे. जळगाव जिल्ह्यातील रावेर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यकर्ता संवाद मेळावा पार पडला. याप्रसंगी एकनाथ खडसे यांच्या भाजप पक्षप्रवेशाविषयी बोलताना शरद पवार म्हणाले की, खडसेंनी नाईलाजाने निर्णय घेतला असावा. त्यांच्यावर तपासयंत्रणादरम्यान दबाव होता, असं पवारे म्हणाले. मोदींची हुकूमशाही राजवट उध्दवस्त झाल्याशिवाय राहणार नाही, असा हल्लाबोलही पवारांनी केला.
मोदी देशाचे नाही तर भापजचे पंतप्रधान असल्यासारखे वागत आहेत.
आज देशाचे चित्र बदलेले आहे. जो देश एकेकाळी धान्य आयात करत होता, आज तोच देश निर्यात करत आहे. आज नरेंद्र मोदी यांचे राज्य आहे. बळीराजाला मदत होईल असे काही सरकारकडून केले जात नाही. पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्यावर टीका केली जात आहे. ज्यांनी देशासाठी खस्ता खाल्ल्या आहेत त्यांच्यावर टीका करणे हे काय पंतप्रधानांचे काम आहे का? नरेद्र मोदी देशाचे नाही तर भाजपचे पंतप्रधान असल्यासारखे वागत आहेत, असा निशाणा शरद पवारांनी नरेंद्र मोदींवर साधला आहे.
शासकीय यंत्रणेचा वापर हूकुमशाहीसारखा केला जातोय.
आज देशात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र पंतप्रधानांकडून शासकीय यंत्रणेचा वापर हा हुकूशाहीसारखा केला जात आहे. मुख्यंत्र्यांवर सीबीआय. ईडी, चौकशी लावून तुरूंगात टाकले जात आहे. याचा अर्थ ही हुकूमशाही आहे. एखाद्याला वैयक्तीक त्रास देण्याचं काम सूरू आहे. यापूर्वी असं कधी होत नव्हतं. त्यामुळे अनेकांना यातना सहन कराव्या लागत आहेत. याचाच प्रभाव एकनाथ खडसेंवर झाला असावा. त्यांच्यावरही तपास यंत्रणांचा दबाव होता. त्यामूळेच त्यांनी नाईलाजाने असा निर्णय घेतला असावा, असं शरद पवार म्हणाले,
मोदींची हुकूमशाही राजवट संपवल्याशिवाय राहणार नाही
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तळागाळातल्या शेवटच्या माणसासाठी काम करण्याचा प्रयत्न केला होता. आता लोकांना मोदी नको आहेत. हुकूमशाही नको तर लोकशाही पाहिजे आहे. मोदींची हुकूमशाही राजवट संपवल्याशिवाय राहणार नाही, इशारा शरद पवारांनी यावेळी बोलताना दिला.