राज ठाकरे यांच्या भाषणावरून 'मनसे'त खदखद
मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी मशिदींवरचे भोंगे, मदरशांबद्दल केलेल्या वक्तव्यावरून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे. त्यापाठोपाठ राज ठाकरे यांच्या भाषणावरून त्यांच्या स्वपक्ष असलेल्या मनसेतच खदखद समोर आली आहे.
मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी शिवसेना, राष्ट्रवादीवर जोरदार टीका केली. तसेच मशिदींवरील भोंगे काढा अन्यथा त्या भोंग्यांच्या समोर त्यापेक्षा मोठ्या आवाजात हनुमान चालिसा लावण्यात येईल, असे राज ठाकरे म्हणाले होते. त्यावरून पुणे येथील राज ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू म्हणून ओळखले जाणारे वसंत मोरे यांनी मी माझ्या मतदार संघात हनुमान चालिसा लावणारे भोंगे मशिदींसमोर लावणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. मात्र मी पक्ष किंवा राज ठाकरे यांच्यावर नाराज नसल्याचे म्हटले आहे.
पुण्यातील वसंत मोरे आणि साईनाथ बाबर या दोन्ही मनसे पदाधिकाऱ्यांच्या मतदार संघात मोठ्या प्रमाणावर मुस्लिम मतदान आहे. त्यातच राज ठाकरे यांनी मशिदी आणि मदरशांविरोधात वक्तव्य केल्याने त्याचा मतांवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे राज ठाकरेंनी केलेल्या आवाहनाच्या विरोधात पुण्यात वसंत मोरे यांनी भुमिका घेत मशिदींसमोर हनुमान चालिसा वाचण्यात येणार नसल्याचे म्हटले आहे.
तसेच राज ठाकरे यांनी मशिदींसमोर हनुमान चालिसा पठन, बेहराम पाडा आणि मुंब्र्यातील मशिदींमध्ये काय चालतं ते केंद्रीय तपास यंत्रणांनी मुंबई पोलिसांना विचारावं. त्यातून अनेक धक्कादायक गैरप्रकार होत असल्याचे समोर येईल, असे वक्तव्य राज ठाकरे यांनी केले होते. त्यावरून पुण्यातील वॉर्ड क्रं ८४ आणि प्रभाग क्रं १८ मधील मनसेचे शाखा अध्यक्ष मजिद शेख या पदाधिकाऱ्याने राज ठाकरे यांच्या मशिदीवरील भोंग्यासंबंधी केलेल्या विधानानंतर राजीनामा दिला.
काही दिवसांपासून बेरोजगारी, महागाई, शिक्षण यांसारखे विषय असताना हे मुद्दे सोडून जात धर्म या विषयावर भर दिला जात आहे. या कारणास्तव मी कोणाच्याही दबावाखाली न येता स्वच्छेने राजीनामा देत असल्याची माहिती माजीद अमीन शेख यांनी पत्रात दिली आहे.
अमीन शेख हे २००९ पासून मनसे पक्षात काम करत आहेत.ते शाखा अध्यक्ष आहेत.त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्या प्रभागात हिंदू-मुस्लीम एकत्रित राहतात.पक्षाचे विचार तळागाळापर्यंत पोहोचविण्याचे काम केले आहे.मात्र गुडीपाडव्याच्या दिवशी राज ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेबाबत नागरिकांमध्ये नाराजी असून त्यामुळे त्यांनी शहर अध्यक्ष आणि विभाग अध्यक्ष यांच्याकडे राजीनामा दिला आहे.
मनसे नेते संदीप देशपांडे यांनी राजीनाम्यासंबंधी बोलताना सांगितलं की, "त्यांचा काहीतरी गैरसमज झाला असल्याची शक्यता आहे. आमचे वरिष्ठ पदाधिकारी त्यांच्याशी चर्चा करतील. काही लोक गैसमज करुन देतात त्यातून हे झालं असावं. पण यातून मार्ग निघेल".