निवडणूक आयोगाने येणाऱ्या अंधेरी पूर्व विधानसभा मतदार संघाच्या पोट निवडणुकीसाठी शिवसेना हे नाव आणि निवडणूक चिन्ह धनुष्यबाण हे गोठवलं आहे. यानंतर राजकीय विश्वातून विविध प्रतिक्रीया येत आहेत. त्यात मनसे कडूनही शिवसेनेवर जैसी करणी वैसी भरणी अशी प्रतिक्रिया देण्यात आली आहे.
सर्वोच्च न्यायालयात धनुष्यबाण चिन्हावर सुरू असलेल्या लढाईत न्यायालयाने सर्वाधिकार निवडणूक आयोगाला दिले होते. त्यानंतर नजिकच असलेल्या अंधेरी पूर्व विधानसभा पोट निवडणुकीसाठी हा प्रश्न निकाली निघण महत्वाच होतं. शनिवारी 8 ऑक्टोबर ला रात्री निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून येणाऱ्या निवडणुकीसाठी शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह दोन्ही गोठवण्यात आल्याचं सांगितलं आहे. यामुळे आता ठाकरे गटाला नव्या चिन्हासह ही निवडणूक लढवावी लागणार आहे. कारण शिंदे गटाने ही जागा भाजपसाठी सोडली आहे. म्हणून उद्धव ठाकरे विरुद्ध भाजप असा थेट सामना या निवडणुकीत रंगणार आहे.
या सगळ्या प्रकारावर मनसेचे नेते गजानन काळे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. "शिवसेना हे नाव आता शिल्लक सेना प्रमुखांना वापरता येणार नाहीये. धनुष्यबाण हे चिन्ह सुद्धा निवडणूक आयोगाने गोठवल आहे. आता शिल्लक सेना प्रमुखांकडे फक्त राष्ट्रवादीचं घड्याळ, अबू आझमी ची सायकल आणि AIMIM chi पतंग इतकेच आधार आणि पर्याय शिल्लक आहेत. शिल्लक सेनेचे युवराज आदित्य ठाकरे यांनी संपलेला पक्ष म्हणून कधी काळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला हिणवलं होतं. आज त्यांचा पक्ष आणि चिन्ह इतिहास जमा होण्याची चिन्हं आली आहेत. काळाचा महिमा बघा जैसी करणी वैसी भरणी!" अशा शब्दात टीका केली आहे.