राज्यात भाजप विरुध्द महाविकास आघाडी सामना रंगला असतानाच औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसला आघाडीची ऑफर दिली आहे. त्यामुळे राज्यात नव्या राजकीय समीकरणाच्या चर्चेला उधाण आले आहे.
पाच राज्यांच्या निवडणूकांपाठोपाठ एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसला आघाडीची ऑफर दिली आहे. त्यामुळे एमआयएमची ऑफर नव्या समीकरणाची नांदी ठरणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळातून व्यक्त केली जात आहे.
सध्या राज्यात एमआयएमचे एक खासदार, दोन आमदार आणि 29 नगरसेवक आहेत. त्यामुळे एमआयएमने राष्ट्रवादी आणि काँग्रेसला दिलेली ऑफर चर्चेचा विषय आहे. जलील म्हणाले की, भाजपला हरवण्यासाठी सर्व पक्षांनी एकत्र यायला हवे. तसेच गेल्या काही दिवसांपुर्वी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी घेतलेल्या भुमिकेचा पुनरुच्चार जलील यांनी केला.
जलील म्हणाले की, राष्ट्रवादी कांग्रेसकडून आमच्यावर आरोप केला जातो की आम्ही भाजपची बी टीम आहोत. आमच्यामुळे भाजप जिंकते आरोप आमच्यावर करण्यात येतो. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आम्हाला भेटायला आल्यानंतर आम्ही त्यांना ऑफर दिली आहे. मात्र त्यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रीया व्यक्त करण्यात आली नाही. मात्र आता राष्ट्रवादी आरोप सिध्द करणार आहे की युती करणार आहे हे पाहणे महत्वाचे आहे, असे मत इम्तियाज जलील यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना व्यक्त केली.
पुढे जलील म्हणाले की, आम्ही काँग्रेसलाही युतीचे आवाहन केले आहे. पण खरं तर आम्ही कोणालाच नको आहोत फक्त मुस्लिम मत हवी आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी आणि काँग्रेस कशाला स्वतःला धर्मनिरपेक्ष मानतो? जर त्यांना मुस्लिम मत हवी असतील तर आमच्यासोबत युती करू, असे जलील म्हणाले.