MIM आणि वंचितच्या भूमिकेने भाजपसाठी सोलापूरची जागा धोक्यात, काँग्रेसला होणार फायदा...!

संविधान बदलण्याची भाषा करणाऱ्या भाजपचा उमेदवार संसदेत जाऊ नये म्हणून उमेदवारी अर्ज मागे...एमआयएमने देखील सोलापूर मतदारसंघातून उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला होता.. दलितांची मते विभागल्यास संविधान बदलण्याचा घाट घालणाऱ्या शक्तींना होणार होता फायदा..आता संविधनासाठी सगळे एकवटल्याने काँग्रेसला होणार फायदा;

Update: 2024-04-23 15:27 GMT

सोलापूर / अशोक कांबळे :

सोलापूर लोकसभा मतदारसंघातील निवडणूक अधिक चुरशीची आणि रंगतदार होताना दिसून येत आहे. कारण उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राहुल गायकवाड यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. तत्पूर्वी एमआयएमने देखील सोलापूर मतदारसंघातून उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे अनुसूचित जाती जमातीसाठी राखीव असलेल्या या मतदारसंघात आता महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे आणि महायुतीचे राम सातपुते यांच्यात मुख्य लढत पाहायला मिळणार आहे.

भाजपसाठी विजयाचा मार्ग खडतर

सोलापूर मतदारसंघात मागील दोन निवडणुकीत भाजपने बाजी मारत सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव केला होता. 2014 च्या निवडणुकीत मोदी फॅक्टरमुळे आणि 2019 च्या निवडणुकीत वंचितचे प्रकाश आंबेडकर यांच्या उमेदवारीमुळे दलित मतांचे विभाजन झाल्याने शिंदे यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. परिणामी दलित मतांचे विभाजन झाल्यामुळे भाजपचे उमेदवार जय सिद्धेश्वर स्वामी यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला होता. यंदाच्या निवडणुकीत देखील वंचितने उमेदवार दिल्यामुळे 2019 च्या निवडणुकीची पुनरावृत्ती होणार असे आडाखे भाजप आणि राजकीय विश्लेषकाकडून बांधले जात होते. कारण वंचित उमेदवारास मिळणारी मते ही काँग्रेसची हक्काच्या मतांच्या विभाजनातून मिळणार होती आणि मतांचे हे विभाजन भाजप उमेदवाराच्या पत्थ्यावर पडणारे होते. परंतु वंचितचे उमेदवार राहुल वाघमारे यांनी सोलापूर लोकसभेच्या निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे भाजपसाठी यंदा विजयाचा मार्ग खडतर ठरणार आहे.

संविधानाला धोका नको म्हणून माघार

निवडणुकीतून माघार घेण्याच्या निर्णयावर प्रतिक्रिया देताना वंचितचे उमेदवार राहुल गायकवाड म्हणाले की, काही संविधान विरोधी शक्तींकडून संविधान बदलण्याची भाषा केली जात आहे. माझ्या उमेदवारीमुळे होणाऱ्या मतांच्या विभाजनाचा फायदा घेऊन संविधान बदलण्याची भाषा करणाऱ्या भाजपचा उमेदवार संसदेत जाईल आणि संविधानाला धोका निर्माण होईल, असे माझ्याकडून काही होऊ नये, असे मला वाटते, त्यामुळे मी या निवडणूकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला. तसेच मी सोलापूरच्या मैदानात लढण्यासाठी उतरलो होतो. पण, माझ्या हातात बंदुक दिली आहे. मात्र, त्या बंदुकीत गोळ्या नाहीत. त्या बंदुकीत छरे आहेत, त्यामुळे मी जिंकणार नाही, असेही निरीक्षण गायकवाड यांनी सोलापुरातील राजकीय परिस्थिती पाहून यावेळी नोंदवले.

संविधानासाठी वंचितचा योग्य निर्णय

भाजपकडून मुद्द्यावर प्रचार करण्याऐवजी धार्मिक ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केला जात होता. त्यातच दलितांची मते विभागल्यास संविधान बदलण्याचा घाट घालणाऱ्या शक्तींना फायदाच होणार होता. त्यामुळे दलित मतांचे विभाजन होऊन भाजपला होणारा फायदा टाळण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचा निवडणुकीतून माघार घेण्याचा हा निर्णय महत्वाचा आणि योग्य असल्याच्या प्रतिक्रिया संविधान प्रेमींमधून उमटताना दिसून येत आहेत.

आमदार प्रणिती शिंदे यांना फायदा

दरम्यान, या सर्व घडामोडी पाहता एमआयएम आणि वंचितच्या या निर्णयाचा राजकीय फायदा महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना होणार आहे. तर दलित मतांचे विभाजन होऊन विजयाची समीकरणे जुळवू पाहणाऱ्या भाजप उमेदवार राम सातपुते यांना मात्र फटका बसणार आहे.

Tags:    

Similar News