नवाब मलिकांच्या अटकेच्या निषेधार्थ आंदोलन, शिवसेनेच्या मंत्र्यांच्या गैरहजेरीची चर्चा

Update: 2022-02-24 07:02 GMT

राष्ट्रवादी काँग्रसेच्या प्रमुख नेत्यांपैकी एक असलेले आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना EDने अटक केली आहे. यानंतर महाविकास आघाडीने आक्रमक भूमिका घेतली आहे. कोर्टाने मलिक यांना 3 मार्चपर्यंत EDची कोठडी दिली आहे. मलिक यांच्या अटकेच्या दुसऱ्या दिवशी राष्ट्रवादीने सकाळपासून राज्यभरात आंदोलनाला सुरूवात केली आहे.

महाविकास आघाडीतर्फे मंत्रालयाजवळच्या महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे प्रमुख नेते उपस्थित होते. पण यावेळी सगळ्यात जास्त चर्चा झाली ती शिवसेनेच्या मंत्र्यांच्या अनुपस्थितीची....शिवसेनेचे मंत्री किंवा ज्येष्ठ नेते या आंदोलनाकडे फिरकले नाही. यासंदर्भात शिवसेनेच्या नेत्या मनिषा कायंदे यांनी नेते पूर्वनियोजित कार्यक्रमात व्यस्त असल्याचे कारण दिले.

यावेळी मंत्री छगन भुजबळ यांनी भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले. कोणत्याही मंत्र्याचे नाव दाऊदशी जोडयाचे आणि त्यांची बदनामी करायची, असा प्रकार भाजप करत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. नवाब मलिक यांनी कोणतीही चूक केलेली नाही. एवढेच नाही तर भाजपातर्फे अनेक नेत्यांना धमक्या देण्यात येत आहेत, असा आरोपही भुजबळ यांनी केला आहे. मलिक यांच्यावर खोटे आरोप करण्यात येत आहेत, त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याचा प्रश्नच नाही, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मांडली. या आंदोलनात अजित पवार, दिलीप वळसे पाटील, बाळासाहेब थोरात, छगन भुजबळ, अस्लम शेख, राजेश टोपे, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, हसन मुश्रीफ, काँग्रेसचे भाई जगताप, प्राजक्त तनपुरे, खासदार सुप्रिया सुळे, शिवसेनेच्या आमदार यामिनी जाधव, अशोक चव्हाण, अदिती तटकरे, सचिन अहिर उपस्थित होते. पण शिवसेनेचे ज्येष्ठ नेते या आंदोलनात दिसले नाही, याचीच चर्चा जास्त झाली.

Tags:    

Similar News