मंत्री जितेंद्र आव्हाडांचा रश्मी शुक्लांविरोधात हल्लाबोल

परमबीर सिंग आणि फोन टॅपिंगमुळं महाराष्ट्राच्या राजकारणाचं वातावरण तापलं असताना रश्मी शुक्ला यांनी परवानगी नसताना फोन टॅप केले, असा खळबळजनक आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

Update: 2021-03-24 15:07 GMT

विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आरोप केलेल्या पोलीस बदली रॅकेट प्रकरणावरून राज्यातलं राजकारण चांगलंच तापलं आहे. यासाठी अनेक अधिकाऱ्यांचे फोन टॅपिंगचे पुरावे आपल्याकडे असल्याचा देखील फडणवीस यांनी दावा केला आहे. या पार्श्वभूमीवर जिथे भाजपाकडून सत्ताधाऱ्यांना टार्गेट केलं जात आहे, तिथेच दुसरीकडे सत्ताधाऱ्यांकडून देखील परवानगीशिवाय फोन टॅपिंग या मुद्द्यावरून विरोधकांवर निशाणा साधायला सुरूवात केली आहे. याच आधारावर राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी फोन टॅपिंगवरून भाजपा आणि वरीष्ठ अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यावर परखड टीका केली आहे.

आपल्या ट्वीटमध्ये आव्हाडांनी रश्मी शुक्ला यांच्यावर थेट निशाणा साधला आहे. "रश्मी शुक्ला यांच्या अहवालाने त्याच फक्त एक सरळ आणि स्वच्छ अधिकारी आहेत आणि बाकीचे सर्वच भ्रष्ट आहेत. हा सरळ सरळ केलेला पोलीस खात्याचा अपमान आहे. शुक्ला यांनी नाव घेतलेल्या सर्व अधिकाऱ्यांनी सरकारचा सल्ला घेऊन त्यांच्याविरोधात कोर्टात जावे", असं आव्हाड म्हणाले आहेत. "पोलीस अधिकारी आहेत म्हणून कुणीही नागरिकांचा फोन टॅप कसा करू शकेल? त्याकरता त्यांचे कोणतेही नियम वा कायदे नाहीत? या प्रकरणात असं दिसतं की अधिकाऱ्यांना वाटलं की ते काहीही करू शकतात. याची खात्री कोण देईल, की अजून किती जणांचे फोन टॅपिंगला लावले होते?" असं देखील आव्हाड ट्वीटमध्ये म्हणाले आहेत.

"फोन टॅप करायचा असेल तर गृहखात्याच्या अतिरिक्त सचिवांची परवानगी लागते. रश्मी शुक्लांनी अशी परवानगी घेतली नसल्याचं सीताराम कुंटेंनी सांगितलं आहे. शुक्लांना फोन टॅपिंगची वाईट सवय होती हे पूर्वीच्या सरकारच्या काळात देखील आरोप झाले आहेत. जेव्हा त्यांनी लिहिलेलं पत्र उघड झालं, तेव्हा त्यांनी माफी मागितली. आत्ताच्या फोन टॅपिंगबद्दल माफी मागितली. सरकारने दयाळू होऊन सौम्य भूमिका घेतली. तेच पत्र वापरून महाराष्ट्र सरकारची बदनामी केली जात आहे", असं जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.

"फोन टॅपिंग हा गुन्हा आहे. केद्र सरकारने फोन टॅपिंगचे काही नियम दिले आहेत. राष्ट्रघातक कृत्य, अतिरेकी संघटनेशी मैत्री याशिवाय तुम्ही फोन टॅपिंग करू शकत नाही. एखादा माणूस इथल्या शांततेचा भंग करू शकतो असं वाटलं, तर तुम्ही फोन टॅप करू शकतात. म्हणजे रश्मी शुक्लांची कारणं संयुक्तिक नव्हती. परवानग्या देखील चुकीच्या घेतल्या. आम्हाला दाट शंका आहे की अनेक मंत्र्यांचे देखील फोन टॅप केले गेले", असा आरोप देखील जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

"राज्य सरकारला मूर्ख बनवत रश्मी शुक्ला यांनी अ व्यक्तीच्या टॅपिंगची परवानगी घेऊन ब व्यक्तीचा फोन टॅप केला हे अत्यंत भयंकर आहे आणि या रिपोर्टच्या माध्यमातून महाविकासआघाडीची बदनामी करण्याचं हे एक नियोजनबद्ध कारस्थान होतं", असा आरोप देखील आव्हाडांनी केला आहे.एकंदरीत फोन टॅपिंगवरुन आघाडीने आता भाजपविरोधी अजेंडा उगारल्यानं राजकीय द्वंद्व वाढणार आहे.

Tags:    

Similar News