16 MLA Disqualification : 16 आमदारांच्या अपात्रता प्रकरणी विधीमंडळात आज सुनावणी
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी 16 आमदारांच्या अपात्रता प्रकरणी वेळापत्रक जारी केलं आहे. त्यानुसार 13 ऑक्टोबर रोजी ही सुनावणी होणार होती. मात्र त्यापुर्वीच गुरुवारी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ही सुनावणी घेण्याचे जाहीर केले आहे.;
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी तातडीने सुनावणी घेऊन 16 आमदारांच्या अपात्रता प्रकरणाचा निर्णय देण्याची मागणी ठाकरे गटाने केली आहे. त्यातच सर्वोच्च न्यायालयानेही 18 सप्टेंबर रोजी झालेल्या सुनावणीवेळी विधानसभा अध्यक्ष वेळकाढूपणा का करत आहेत? असा सवाल उपस्थित केला होता. त्यानंतर 25 सप्टेंबर रोजी झालेल्या सुनावणीत विधानसभा अध्यक्षांसमोर दोन्ही गटाने आपली बाजू मांडली होती. त्यामध्ये ठाकरे गटाने सर्वांच्या सुनावणी एकत्रित घेण्याची मागणी केली होती. तर शिंदे गटाने प्रत्येक आमदाराची सुनावणी स्वतंत्रपणे घेण्याची मागणी केली होती. त्यामुळे 25 सप्टेंबर रोजी झालेल्या सुनावणीनंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी 13 ऑक्टोबर रोजी सुनावणी घेण्याचे जाहीर केले होते. तसेच त्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी या प्रकरणी वेळापत्रक जारी केले. मात्र 13 ऐवजी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी एक दिवस आधीच सुनावणी घेतली आहे.
गुरुवारी दुपारी 2 वाजता 16 आमदारांच्या अपात्रता प्रकरणी विधीमंडळाच्या सेंट्रल हॉलमध्ये सुनावणी होणार आहे. मात्र त्यापुर्वी 16 आमदारांच्या अपात्रता प्रकरणी होणारी सुप्रीम कोर्टातील सुनावणी एक महिन्याने पुढे ढकलण्यात आली आहे.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर आमदारांच्या अपात्रता प्रकरणी वेळकाढूपणा केल्याचा आरोप ठाकरे गटाकडून केला जात आहे. त्यावर राहुल नार्वेकर यांनी सांगितले की, आमदारांच्या अपात्रता प्रकरणी योग्य निर्णय होईल. यामध्ये घाईने निर्णय घेऊन कुणावरही अन्याय होणार नाही, याची काळजी घेतली जाईल. मी वेळकाढूपणा करत नसून जर वेळकाढूपणा करत असतो तर एक दिवस आधी सुनावणी घेतली नसती, असं म्हणत टीकाकारांना उत्तर दिले.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना आमदारांच्या अपात्रता प्रकरणी विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, ज्यांचं कामकाज आहे. त्यांनी ते करावं. मी त्याबद्दल काही बोलणार नाही. कारण सुप्रीम कोर्ट या प्रकरणावर लक्ष ठेऊन आहे.