तुमच्या खासदाराने लोकसभेत किती प्रश्न विचारले?
17 व्या लोकसभेच्या 5 अधिवेशनात तुमच्या खासदारांनी लोकसभेत किती प्रश्न उपस्थित केले? कोणत्या प्रश्नावर भाष्य केलं? सुप्रिया सुळें टॉपवर कशा? सोलापूरचे खासदारांचे सर्वात कमी प्रश्न तुमच्या खासदारांची काय आहे स्थिती?;
१७ व्या लोकसभेतील एकूण ५ अधिवेशनांत महाराष्ट्रातील ४८ खासदारांनी ६ हजार ९४४ इतके प्रश्न उपस्थित केले. महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींचे लोकसभेतील एकूण प्रमाण ९ टक्के असले तरी या खासदारांनी सभागृहात मांडलेल्या प्रश्नांचे प्रमाण २९ टक्के इतके लक्षणीय राहिले. अभ्यासासाठी निवडलेल्या १० मंत्रालयीन खात्यांपैकी सर्वाधिक ५०७ प्रश्न हे आरोग्याशी निगडीत असल्याचे संपर्क संस्थेच्या अहवालात दिसून आले.
मुंबईस्थित 'संपर्क' या धोरणविषयक अभ्यास व पाठपुरावा करणाऱ्या संस्थेने महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींच्या लोकसभेतील कामगिरीचा आढावा घेत शुक्रवारी (ता. १८ जून) आपला अहवाल प्रकाशित केला. मे २०१९ ते मार्च २०२१ या काळातील लोकसभेच्या ५ अधिवेशनांत विचारलेल्या तारांकित व अतारांकित प्रश्नांसंदर्भातील माहितीचे विश्लेषण या अहवालात करण्यात आले आहे.
गेल्या पाच अधिवेशनांत महाराष्ट्रातील खासदारांनी सरासरी १५४ प्रश्न विचारले. राष्ट्रीय पातळीवर ही सरासरी केवळ ४९ प्रश्न एवढी आहे. याचाच अर्थ महाराष्ट्रातील खासदारांची प्रश्न विचारण्याची सरासरी ही राष्ट्रीय सरासरीच्या तिप्पट ठरली. ५ अधिवेशनात मिळून संसदेत विचारल्या गेलेल्या एकूण २३ हजार ९७९ प्रश्नांपैकी महाराष्ट्रातील ३८ पुरुष खासदारांनी विचारलेले एकूण ५ हजार ९४६ तर ७ महिला खासदारांचे ९९८ प्रश्न समाविष्ट आहेत.
पक्षनिहाय कामगिरीचा विचार करता २४ खासदार असलेल्या भाजपने ३ हजार ११६ प्रश्न, १७ खासदार असलेल्या शिवसेनेने २ हजार ५३९ प्रश्न, चार खासदार असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने ९५९ प्रश्न तर काँग्रेसचे एकमेव खासदार असलेल्या चंद्रपूरच्या सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांनी १२३ प्रश्न मांडले.
एमआयएमचे औरंगाबादेतील खासदार इम्तीयाज जलील यांनीही १७९ प्रश्न तर अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी २८ प्रश्न पटलावर आणले. महिला व बाल विकासाचे १५५ प्रश्न मांडले गेले. सर्वाधिक प्रश्न विनायक राऊत यांनी उपस्थित केले. सामाजिक न्यायाशी संबंधित १०८ प्रश्न मांडले गेले. यापैकी अशोक नेते, सुधाकर श्रृंगारे व इम्तियाज जलील यांनी अनुक्रमे ११, ७ व ६ प्रश्न विचारले. जलशक्ती मंत्रालयाच्या अनुषंगाने २२३ प्रश्न पुढे आले.
यात धैर्यशील माने, हेमंत पाटील व सुधाकर श्रृंगरेंनी अनुक्रमे १२, ११ व १० प्रश्न मांडले. ग्रामविकासाबाबत विचारलेल्या १४० प्रश्नांत श्रीकांत शिंदे व कृपाल तुमाने यांनी प्रत्येक ७ तर इतर पाच खासदारांनी प्रत्येकी ६ प्रश्न विचारले. १५ खासदारांच्या मतदारसंघात आदिवासींची संख्या लक्षणीय असली तरी या विषयाशी निगडीत केवळ ६२ प्रश्नच पुढे आले. १५ खासदारांनी प्रत्येकी १ तर १४ खासदारांनी एकही प्रश्न मांडला नाही.
मानवसंसाधन विकासाबाबत विचारल्या गेलेल्या २५४ प्रश्नांपैकी सुप्रिया सुळे, सुनील तटकरे व सुधाकर श्रृंगारे यांनी अनुक्रमे १५, १४ व १३ प्रश्न मांडले.
शेती व शेतकरीविकासाबाबत ४१८ इतके प्रश्न पुढे आले. यात श्रीरंग बारणे, संजय मंडलिक व गजानन कीर्तीकर या तीनही शिवसेना खासदारांनी अनुक्रमे २७, २६ व २३ प्रश्न विचारले.
गृहनिर्माण व शहरविकासाबाबत २०९ तर कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयाशी निगडीत ७८ प्रश्न महाराष्ट्रातील खासदारांनी उपस्थित केले. जनतेला भेडसावणाऱ्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी प्रश्नोत्तरांचा तास हे एक महत्वाचे आयुध आहे. हे आयुध वापरुन चर्चा घडवून आणण्यात महाराष्ट्रातील खासदार आघाडीवर असल्याचे संपर्कच्या अहवालातून स्पष्ट झाले असून ही कामगिरी उंचावत जाणे राज्याच्या हिताचे ठरेल.
सुप्रिया सुळे ३१३ प्रश्नांसह अव्वल
बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सर्वाधिक म्हणजे ३१३ प्रश्न लोकसभेत उपस्थित केले तर सोलापूरचे खासदार डॉ.जयसिध्देश्वर महास्वामी यांनी सर्वात कमी म्हणजे केवळ २० प्रश्न पटलावर आणले.
महिला खासदारांची कामगिरी
-डॉ.हीना गावित २४० प्रश्न
-डॉ.प्रीतम मुंडे १५७ प्रश्न
-पूनम महाजन १३० प्रश्न
-भारती पवार १०९ प्रश्न
-नवनीत राणा २८ प्रश्न
-भावना गवळी २१ प्रश्न
अल्प मानव विकास निर्देशांक असलेल्या नंदुरबार जिह्यातून २४० प्रश्न
राज्यात सर्वाधिक म्हणजेच ०.८४१ इतका उच्च मानव विकास निर्देशांक असलेल्या मुंबई जिल्ह्यातून एकूण ९०० प्रश्न विचारले गेले तर सर्वात अल्प ०.६०४ माविनी असलेल्या नंदूरबारमधून २४० प्रश्न पुढे आले.