महादेव जानकरांना मिळाली शिट्टी...! परभणीत शिट्टी VS मशाल, असा रंगणार सामना
राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष परभणी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार महादेव जानकर यांना निवडणूक आयोगाकडून निवडणूकीसाठी शिट्टी हे चिन्ह बहाल करण्यात आलं आहे. त्यामुळे आता परभणीत मशाल विरूध्द शिट्टी असा सामना रंगणार आहे. परभणी लोकसभा मतदारसंघात ओबीसींच्या मतांचा विचार करता ही लढत निर्णायक ठरणार आहे.
परभणी लोकसभेचे शिवसेना ठाकरे गटाचे विद्यमान खासदार बंडू जाधव यांचा पराभव करण्यासाठी महायुतीकडून महादेव जानकर यांना उमेदवारी देण्यात आली. परंतु, जानकर यांनी महायुतीमधील मोठ्या मित्रपक्षांच्या चिन्हावर निवडणूक लढणार नसल्याचे स्पष्टपणे जाहीर केले होते. त्यामुळे राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्या कोट्यातून 'रासप' ला परभणीची जागा सोडण्यात आली. परंतु रासपला निवडणूक लढवण्यासाठी चिन्ह नसल्याने त्यासंदर्भात निवडणूक आयोगाकडे मागणी करण्यात आली होती. तर आज त्यांना निवडणूकीसाठी शिट्टी हे चिन्ह देण्यात आले आहे.