शिवसेना 1993 बाँबस्फोटाचे समर्थन करणार का? चंद्रकांत पाटील यांचा शिवसेनेला सवाल

Update: 2022-02-26 07:44 GMT

मुंबई : राज्याचे अल्पसंख्यांक विकास मंत्री नवाब मलिक यांना मुंबई अंडरवर्ल्डशी संबंधीत मालमत्ता खरेदी प्रकरणासह मनी लाँडरिंग प्रकरणी ईडीने अटक केली आहे. मात्र नवाब मलिक यांचा राजीनामा घेण्यात येणार नसल्याचे महाविकास आघाडीकडून सांगण्यात आले आहे. तर नवाब मलिक यांच्या समर्थनार्थ आंदोलन केले जात आहे. त्यावरून महाविकास आघाडी एकप्रकारे दाऊदचेच समर्थन करत असल्याचा आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. ते पुण्यात बोलत होते.

भाजप ईडीचा गैरवापर करत असल्याचा आरोप महाविकास आघाडीकडून करण्यात येत आहे. त्यापार्श्वभुमीवर राज्याचे मंत्री नवाब मलिक यांना ईडीने अटक केली आहे. तर त्यांना 3 मार्च पर्यंत ईडीची कोठडी सुनावण्यात आली आहे. तर नवाब मलिक यांनी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची बेनामी मालमत्ता खरेदी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच मनी लाँडरिंग प्रकरणी त्यांना अटक करण्यात आले आहे. मात्र नवाब मलिक यांचा राजीनामा घेण्यात येणार नसल्याची माहिती महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दिली आहे. तर मलिक यांचा राजीनामा घेण्यासाठी भाजपने राज्यात आंदोलन छेडले आहे.

नवाब मलिक यांना अटक झाल्यानंतर त्यांच्या समर्थनार्थ महाविकास आघाडीने राज्यभरात आंदोलन छेडले. त्यावरून चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीला टोला लगावला. चंद्रकांत पाटील म्हणाले, नवाब मलिक यांच्या अटकेनंतर अजूनही त्यांचा राजीनामा का नाही? आम्ही मलिक यांचा राजीनामा घेतल्याशिवाय शांत बसणार नाही. तसेच पुढे बोलताना त्यांनी मलिक यांचा राजीनामा न घेऊन शिवसेना 1993 च्या बाँबस्फोटाचे समर्थन करणार का? असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी विचारला.

तसेच नवाब मलिक यांच्या समर्थनार्थ मंत्रालयाच्या समोरच्या महात्मा गांधी पुतळ्याजवळ महाविकास आघाडीने केलेले आंदोलन बेकायदेशीर आहे. याबरोबरच जोपर्यंत शिवसेना महाविकास आघाडीत असणार आहे. तोपर्यंत सावकर हे शिवसेनेसाठी अडचणीचे ठरणार आहेत. त्यामुळेच सेनेला गप्प बसावे लागत असल्याचा टोला चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला लगावला.

याबरोबरच मुंबई महापालिकेत भाजपच्या 82 जागा असतानाही महापौर पदासह महापालिक सेनेच्या ताब्यात दिली. त्यामुळे भाजपला सत्तेचा हव्यास नसून शिवसेनेलाच सत्तेचा हव्यास आहे, असे प्रत्युत्तर चंद्रकांत पाटील यांनी दिले.

Tags:    

Similar News