लुटमार, खंडणी, ब्लॅकमेलिंग हा भाजपचा अधिकृत धंदा - ठाकरे गटाची टीका

Update: 2024-03-04 09:20 GMT

"गेल्या दहा वर्षांत जेवढे घोटाळे झाले ते गेल्या ७०-७५ वर्षांत झाले नसतील. भ्रष्टाचारी मंडळींवर आधी आरोप करायचे मग निर्लज्जपणे त्यांनाच मांडीवर घेऊन बसायचे. गेल्या दहा वर्षात खोटेपणाचे जेवढे उंच डोंगर उभे केले, त्यामुळे हिमालयाची उंचीही तोकडी पडेल. हर्षवर्धन पाटील, हसन मुश्रीफ, यांच्याप्रमाणे आता अजित पवारांनाही शांत झोप लागायला सुरूवात होईल. राज्य बॅंक घोटाळ्यामुळे अजित पवारांना नाहक मनस्ताप झाला. त्यांना कुटूंब-पक्षाचा त्याग करावा लागला. बदनामी झाली ती वेगळीच." असं भाष्य ठाकरे गटाने मुखपत्रातून केले आहे.

फडणवीसांवर ठाकरे गटाची टीका

अजित पवारांच्या कथित बॅंक घोटाळ्यांवर फडणवीस यांनी तांडव केले होते. महाराष्ट्रात जनतेचा पैसा पवारांनी व त्यांच्या गँगने लुटल्याचा आरोपच नव्हे, तर आपल्याकडे पुरावे असल्याचे ते सांगत होते. आता या पुराव्याचे काय झाले? हे पुरावे त्यांनी गिळून ढेकर दिला की काय? भ्रष्टाचाऱ्यांना, गुन्हेगारांना साथ देण्याची "मोदी गॅरंटी" फडणवीस यांनी अंमलात आणली. फडणवीसांनी शिखर बॅंक घोटाळ्याचे पुरावे नष्ट केले असतील तर त्या आरोपाखाली फडणवीस यांच्यावर कायदेशीर कारवाई केली पाहिजे, अशी टीकाही ठाकरे गटाने केली आहे.

लुटमार, खंडणी, ब्लॅकमेलिंग यांचा धंदा

लुटमार, खंडणी, ब्लॅकमेलिंग लुटमार हा भाजप सरकारचा अधिकृत धंदा झाला आहे व राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मूक संमतीशिवाय हा धंदा इतका तरारू शकत नाही. ईडी तपासाच्या २०० फायली एका खासगी इसमाकडे सापडतात हा गृहमंत्र्यांना गुन्हा वाटत नाही का? कोणत्या ईडी अधिकाऱ्यांवर त्यांनी याप्रकरणी गुन्हे दाखल करायचे आदेश दिले? की रोमी भगतचे नाव लोकसभेच्या संभाव्य भाजप उमेदवारांच्या यादीत हे लोक टाकत आहेत? भाजपच्या राज्यात काहीही घडू शकते, असेही ठाकरे गटाने म्हटले आहे.

Tags:    

Similar News