पक्षांतर केलेल्यांच्या 'रूटीन' चौकश्या सुरू: गृहमंत्री अनिल देशमुख
ऐन निवडणुकीच्या काळात पक्षाला रामराम ठोकत भाजपचं कमळ हातात घेणाऱ्या नेत्यांच्या चौकशीला सुरुवात, भाजपमध्ये जाऊन पवित्र झालेल्या नेत्यांची धाकधुक वाढणार?;
महाविकास आघाडी सरकार आता चांगलंच स्थिर स्थावर झालं आहे. राजकीय, प्रशासकीय पातळीवर तीनही पक्षांचा चांगला मेळ बसताना दिसतो आहे. शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादीच्या विरोधात बोलणाऱ्या विरोधकांना तीनही पक्ष जोरदार उत्तर देताना पाहायला मिळत आहे.
देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात सुरु झालेले आणि या सरकारला नको असलेले प्रकल्प देखील आता बंद करुन झाले आहेत. फडणवीसांच्या निकटवर्तीय समजले जाणारे अधिकारी देखील आता बदली करुन झाले आहेत... Covid शी लढा सुरु असताना आता महाविकास आघाडीचा पुढचा राजकीय अजेंडा काय? असा सवाल उपस्थित केला जात असताना महाविकास आघाडीचा पुढचा अजेंडा समोर आला आहे.
ऐन निवडणुकीच्या काळात पक्षाला राम राम करत भाजप चं कमळ हातात घेणाऱ्यांसाठी पुढील काळात कठीण राहणार आहे. भाजपच्या वॉशिंग मशीन मध्ये जाऊन पवित्र झालेल्या अनेक नेत्यांची प्रकरण पुन्हा नव्याने उघडली जाणार आहेत.
कारखान्याच्या कर्जातील अपहार, जमीन घोटाळे, बॅकांमधील घोटाळे, विविध सहकारी संस्थांमधील घोटाळे, अनेक जुन्या केसेस, राजकीय गुन्हे असलेल्या नेत्यांना धमकावून भाजप ने ऐन निवडणुकीच्या काळात स्वत:च्या पक्षात घेतल्याचा आरोप वारंवार केला जातो. पक्षाच्या अडचणीच्या काळात पक्ष सोडून गेलेल्या या गय्या रामाच्या फाइल आता ओपन होणार असल्याचं समतंय.
महाविकास आघाडी सरकार या नेत्यांना चांगलाच धडा शिकवणार आहे. त्यामुळं भाजप मध्ये गेलेल्या अनेक नेत्यांचा बीपी वाढण्याची शक्यता आहे. तसं भाजपमधून राष्ट्रवादी मध्ये आलेल्या एकनाथ खडसे यांनी देखील अशा प्रकारची भाषा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या समोर बोलून दाखवली आहे.
त्यातच कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्यापासून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते, शिवसेनेचे नेते पक्षात इनकमिंग होणार असल्याचं वारंवार बोलून दाखवलं जात आहे. आता हे इनकमिंग कसं होणार? भाजपने ज्या पद्धतीने इनकमिंग केलं त्याच पद्धतीने इनकमिंग होणार का? असा सवाल देखील उपस्थित होतो.
या संदर्भात राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी देखील बिहार निवडणुकीनंतर महाराष्ट्रात लवकरच सत्ता परिवर्तन होईल असं भाजप म्हणत आहे. मात्र, तसं होणार नाही. देवेंद्र फडणवीस काहीही म्हणू द्या, आम्ही आमचा कार्यकाळ पूर्ण करणार, उलट भाजपातच लवकरच गळती लागणार आहे. त्यानंतर फडणवीस असं बोलणार नाहीत. असं म्हणत इनकमींग चे संकेत दिले आहेत. औरंगाबाद येथील मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांच्या कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
दरम्यान या संदर्भात आम्ही गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी बातचित केली असता, ते म्हणाले विशेष अशी काही चौकशी लावलेली नाही. रुटीन चौकशी सुरु आहे.
यावरुन मागच्या सरकारने ज्यांची चौकशी सुरु केली. आणि त्यानंतर भाजपमध्ये प्रवेश केला अशा नेत्यांची चौकशी सुरु आहे का? असा सवाल देखील या निमित्ताने उपस्थित होत आहे. त्यामुळे येत्या काळात भाजपमध्ये गेलेले अनेक नेते स्वगृही परतले तर आश्चर्य वाटायला नको