लातूर ग्रामीण विधानसभा 'फिक्सींग' होती:माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर
लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघासाठी शिवसेनेला सोडण्यात आलेली जागा मुंबई शहरातील जागेच्या बदल्यात 'फिक्सींग' झाली होती, असा गंभीर आरोप माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी केला आहे.
लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघासाठी जी जागा परंपरेने भाजपची होती. भाजपचे रमेश आप्पा कराड यांना जनता निवडून आणण्यासाठी याठिकाणी प्रयत्न करत होती. शिवसेनेने या जागेसाठी आग्रह धरला व अचानक ही जागा सनेला देण्यात आली. या ठिकाणी शिवसेनेला उमेदवार देखील नव्हता. सेनेने जो उमेदवार इथे दिला तो फॉर्म भरल्यानंतर जो गायब झाला तो कोणालाच दिसला देखील नाही. शिवसैनिकांना उमेदवार हरवला आहे अशी पोस्ट टाकावी लागली. माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख याचे चिरंजीव धीरज देशमुख हे येथून विजयी झाले. हा सर्व प्रकार मुंबई शहरातील एका जागेच्या बदल्यात 'फिक्सींग' केलेला होती असा आरोप करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि आमदार धीरज देशमुख यांच्या राजकीय व्यवहाराबद्दल माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी खळबळजनक खुलासा केला आहे.
रमेश आप्पा कराड यांनी शिवसेनेकडून निवडणूक लढवावी असाही प्रयत्न झाला पण...
शिवसेनेचे या जागेचा आग्रह धरला आणि ती ताब्यात घेतली. शेवटी आम्ही रमेश आप्पा यांना शिवसेनेकडून निवडणूक लढवावी असाही प्रयत्न केला. शिवसेनेकडे कोणता उमेदवार देखील या ठिकाणी नव्हता. रमेश आप्पा शिवसेने कडून उमेदवारी घेण्यास तयार झाले पण तोपर्यंत शिवसेनेनं उमेदवार घोषित केला होता. कोणालाही अपरिचित असा उमेदवार या ठिकाणी शिवसेनेनं दिल्याचं निलंगेकर यांनी म्हंटल आहे.
शिवसेनेच्या उमेदवारापेक्षा नोटाला अधिक मतदान
धीरज देशमुख यांच्यानंतर नोटाला मतदारांनी सर्वाधिक मतदान केलं आहे. तब्बल 26,899 मतं नोटाला दिली याचाच अर्थ या ठिकाणी फिक्सिंग करत शिवसेनेला मॅनेज केलं गेलं. ही जागा सहज सोडून दिली असेल का? या ठिकाणी लोकशाहीचा खून केला आहे. तुम्ही जर वर बसून सेटलमेंट करू असे ठरवत असाल तर जानता तुम्हाला माफ करणार नाही असं निलंगेकर यांनी म्हंटल आहे.
कोणाला किती मते मिळाली होती?
लातूर ग्रामीण मतदारसंघातून धीरज देशमुख 1 लाख 31 हजार 321 मतांनी विजयी झाले होते. या नंतर दोन नंबर ला नोटाला लोकांनी पसंती दिली होती. नोटाला तब्बल 26,899 इतकी मत मिळाली होती.त्यानंतर शिवसेनेच्या सचिन देशमुख यांना 13113 मतं तर वंचितचे उमेदवार बळीराम डोने यांना येथे 12,670 मतं मिळाली होती.