कै. सावित्रीबाई फुले पुरस्कार आता "ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार" या नावाने देण्यात येणार
राज्य सरकारने सामाजिक क्षेत्रात कार्यरत महिलांसाठी दिला जाणारा "कै. सावित्रीबाई फुले पुरस्कार" या पुरस्काराचे नाव बदलून आता "ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार" असे करण्यात आले आहे. तसेच पुरस्काराची रक्कम पूर्वी २५ हजार रुपये होती ती आता वाढवून १ लाख रुपये करण्यात आल्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे. या संदर्भात अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सरकारचे अभिनंदन केले आहे.
हा पुरस्कार सामाजिक समता, स्त्री शिक्षण, कमकुवत गटातील मुलामुलींचे शिक्षण अशा क्षेत्रांमध्ये निरलसपणे आणि सेवावृत्तीने कार्य करणाऱ्या महिलांना क्रांतिज्योती सावित्रीमाईंच्या नावाने दिला जातो. यांसंदर्भात मंत्री छगन भुजबळ यांनी एक्स पोस्ट करत अभिनंदन केलं आहे ते म्हणाले की " दुर्दैवाने, प्रतिसादाअभावी गेल्या १० वर्षांपासून शासनाकडून हा पुरस्कार बंद करण्यात आला होता. परंतु, सातत्याने पाठपुरावा आणि मागणीनंतर नुकताच हा पुरस्कार पुन्हा सुरू करण्याची घोषणा सरकारने केली होती. त्यानंतर पुरस्काराचे नाव बदलण्याची आणि रक्कम वाढवण्याची मागणीही मान्य करण्यात आली आहे. पुन्हा पुनरुज्जीवित करण्यात आलेल्या या पुरस्काराने आता राज्यातील महिलांना पुन्हा एकदा सन्मानित करण्यात येणार आहे. पुरस्काराचे नाव बदलून आणि रक्कम वाढवून त्याचे महत्त्व वाढवण्यात आले आहे. हे निश्चितच सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांसाठी प्रेरणादायी असल्याचं मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले आहे