किरीट सोमय्या यांना दापोलीत अडवले
किरीट सोमय्या हे अनिल परब यांच्या विरोधात चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यातच अनिल परब यांचे कथीत दापोली येथील रिसॉर्ट अनधिकृत असल्यचा दावा करत त्यावर कारवाई करण्याची मागणी सोमय्या यांनी केली. त्यासाठी किरीट सोमय्या प्रतिकात्मक हातोडा घेऊन दापोलीच्या दिशेने निघाले होते. मात्र पोलिसांनी सोमय्यांना अडवून ताब्यात घेतले आहे.;
राज्यात भाजप विरुध्द महाविकास आघाडी संघर्ष तीव्र झाला आहे. त्यातच किरीट सोमय्या हे अनिल परब यांच्याविरोधात आक्रमक झाले आहेत. तर दापोली येथील समुद्रकिणारी असलेले अनिल परब यांचे रिसॉर्ट अनधिकृत असल्याचा दावा करत त्यावर कारवाई करण्याची मागणी केली. त्यासाठी सोमय्या सकाळी मुलुंड येथून प्रतिकात्मक हातोडा घेऊन दापोली येथील अनिल परब यांचे रिसॉर्ट तोडण्यासाठी निघाले होते. त्यामुळे त्यांना कशेडी पोलिसांनी अडविले.
किरीट सोमय्या यांना कशेडी घाटात पोलिसांनी अडविल्यानंतर त्यांनी रत्नागिरीत येथे जात शक्तीप्रदर्शन केले. यावेळी निलेश राणे उपस्थित होते. तर त्यानंतर किरीट सोमय्या दापोली येथे पोहचले असता पोलिसांनी त्यांना अडवून ताब्यात घेतले. त्याबरोबरच किरीट सोमय्या यांना ताब्यात घेऊन पोलिस स्टेशनला नेण्यात आले.
पोलिसांनी किरीट सोमय्या यांना का अडविले?
पोलिसांनी किरीट सोमय्या यांना अडवताना सांगितले की, ज्या अर्थी मुरुड येथील साई रिसॉर्ट तोडण्यासाठी किरीट सोमय्यांकडून आंदोलन करण्यात येणार होते. त्यामुळे सध्या सणासुदीचा काल सुरू असल्याने स्थानिकांच्या रोजी रोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे सोमय्या यांच्याविषयी स्थानिकांमध्ये मोठा रोष आहे. त्यामुळे सोमय्या यांच्या सुरक्षेच्या प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे पोलिसांनी किरीट सोमय्या यांना अडवले.
किरीट सोमय्या यांना अडवल्यानंतर पोलिस आणि सोमय्या यांच्यात खडाजंगी झाली. मात्र त्यानंतर पोलिसांनी किरीट सोमय्या यांना कलम 149 अन्वये नोटीस जारी केली. त्यामध्ये रत्नागिरीचे जिल्हाधिकारी यांनी 17 मार्च ते 22 मार्च या कालावधीत होळी, रंगपंचमी, धुलीवंदन तर 2 एप्रिल रोजी गुढीपाडवा सण असल्यामुळे 29 मार्चपर्यंत मनाई आदेश जारी केले आहेत. त्यामुळे सोमय्या यांनी कायदेशीर मार्गाने न्याय मिळवावा. त्यांनी कोणाच्याही खासगी जागेत अनधिकृतरित्या प्रवेश करू नये, असे पोलिसांनी सांगितले. तसेच त्यांच्याकडून गैरकृत्य झाल्यास दखलपात्र किंवा अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले होते. मात्र त्यानंतरही सोमय्या यांनी दापोली येथे प्रवेश केल्यामुळे त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.