किरीट सोमय्या यांनी रायगड जिल्ह्यातील कोर्लई येथील रश्मी ठाकरे यांच्या मालमत्तेप्रकरणी गंभीर आरोप केले होते. त्यामुळे राज्यातील राजकारण तापले होते. मात्र काही काळ वातावरण शांत झाले आहे, असे वाटत असतानाच किरीट सोमय्या यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे म्हटले आहे.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या नावावर असलेल्या 19 बंगल्याप्रकरणी किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा आक्रमक भुमिका घेतली आहे. तर या 9 एकर जागेवर असलेल्या कथित 19 बंगल्याबाबत सोमय्या यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे म्हटले आहे. तर यासंदर्भात किरीट सोमय्या यांनी Adv. अंकित बोरा यांच्या निवासस्थानी दहा वकिलांसोबत किरीट सोमय्या यांनी चर्चा केली. त्यानंतर बोलताना किरीट सोमय्या यांनी सांगितले की, रश्मी ठाकरे यांच्या 9 एकर जमिनीवरील कथीत 19 बंगल्याप्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार आहे. तर किरीट सोमय्या यांनी उचललेल्या पावलामुळे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या अडचणीत वाढ होणार असल्याची चर्चा आहे.
कोर्लई येथील बंगलाप्रकरणी किरीट सोमय्या यांनी वकिलांना कागदपत्रे दिले आहेत. येत्या आठ दिवसात हे प्रकरण तयार करून ते सोमय्या यांच्याकडे देण्यात येणार आहे. त्यानंतर उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार येणार आहे. त्यामुळे या प्रकरणाची खरी वस्तुस्थिती न्यायालयामार्फतच जनतेसमोर येणार आहे, अशी प्रतिक्रीया सोमय्या यांचे वकील Adv. किरण कोरमकर यांनी दिली.
किरीट सोमय्या यांच्यासोबत Adv. अंकीत बोरा, किरण कोरमकर, अमित देशमुख, सुहास कारूळकर, श्रीराम ठोसर, अभिषेक सावंत, श्रीविष्णू शशीधरण, निखील चव्हाण, मिलिंद साळावकर, वैशाली बंगेरा ही वकिलांची फौज उपस्थित होती.