खडसे विरुद्ध गिरीश महाजन, सुडाच्या राजकारणावरुन आरोप- प्रत्यारोप
एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर जळगाव जिल्ह्यात खडसे विरुद्ध गिरीश महाजन संघर्ष आता उघडपणे सुरू झाला आहे.
"राज्यात आता काय चालले आहे, हे मला माहिती नाही. कारण मी घरी बसलो आहे. परंतु, सुडाच्या राजकारणाचा सर्वात मोठा बळी कोणी असेल, तर तो एकनाथ खडसे आहे. माझ्या बाबतीत अत्यंत खालच्या पातळीचे राजकारण करण्यात आले," अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांच्यावर हल्लबोल केला आहे.
जळगावातील मराठा विद्याप्रसारक संस्थेच्या वादात माजीमंत्री गिरीश महाजन यांच्यासह त्यांचे स्वीय सहाय्यक रामेश्वर नाईक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत काल खुलासा करताना गिरीश महाजन यांनी आपल्यावर सुडाच्या राजकारणातून खोटा गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यामागे जिल्ह्यातील एक बडा नेता असल्याचा गौप्यस्फोट केला होता. यावेळी महाजन यांनी एकनाथ खडसे यांचा नामोल्लेख टाळून त्यांच्याकडे अंगुलीनिर्देश केला होता.
खडसे पुढे म्हणाले की, काहीएक कारण नसताना खालच्या दर्जाचे राजकारण करत माझ्यासारख्या व्यक्तीवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा मुक्ताईनगरात घडल्याचे दाखवून शून्य क्रमांकाने तो मुंबईत दाखल करण्यात आला. कुणाच्या तरी दबावाशिवाय हे घडणे शक्य होते का? असेही खडसे म्हणाले.
गिरीश महाजन यांनी केलेल्या आरोपाबाबत बोलताना खडसेंनी सांगितले की, मी काही बडा नेता नाही. विधीमंडळाचा सदस्यही नाही. मंत्रिमंडळावर माझा प्रभाव नाही. जिल्ह्यात अनेक बडे नेते आहेत. त्यामुळे गिरीश महाजन यांनी थेट नाव घ्यायला हवं होतं, असेही खडसे म्हणाले.