कसबा पेठमध्ये चुरस, चिंचवडमध्ये एकांगी लढत
पुणे जिल्ह्यातील कसबा पेठ आणि चिंचवड या पोटनिवडणूकीत भाजपची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. कसब्यात नेमकं काय आहे गणित? चिंचवडमध्ये कोण बाजी मारणार? याविषयी सविस्तर विश्लेषण केले कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणूकीचा ग्राऊंडवरून वेध घेतलेल्या मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी भरत मोहळकर यांनी....;
Kasaba peth And Chinchwad bypoll Result : कसबा आणि चिंचवड या पोटनिवडणूकीसाठी महाविकास आघाडी विरुध्द भाजप (Mahavikas Aghadi Vs BJP) असाच सामना रंगला होता. यामध्ये कसब्यात कोण बाजी मारणार? यासाठी पैंजा लागल्या आहेत. त्याबरोबरच कसब्यात आणि चिंचवडमध्ये समर्थकांनी निकालापुर्वीच विजयाचे फ्लेक्स लावले आहेत. त्यामुळे निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. राज्यातील सत्तांतरानंतर पहिल्यांदाच होत असलेल्या पोटनिवडणूकीत महाविकास आघाडी विरुध्द भाजप अशीच रंगत पहायला मिळाली. यामध्ये कसबा (Kasaba) आणि चिंचवड (Chinchwad) या भाजपकडे असलेल्या जागा जिंकून महाविकास आघाडी आपला आत्मविश्वास वाढवण्यासाठी प्रयत्नरत असणार आहे. तर भाजप या जागा जिंकून पुणे महापालिका निवडणूकीची विजयी सुरुवात करण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही निवडणूक दोन्ही बाजूंसाठी महत्वाची आहे. भाजपने (BJP) ही निवडणूक जिंकण्यासाठी केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह मंत्रीमंडळ, आमदार आणि नगरसेवकांचा मोठा फौजफाटा प्रचारात आणला होता. दुसरीकडे महाविकास आघाडीनेही शरद पवार, अजित पवार, आदित्य ठाकरे, नाना पटोले अशा प्रमुख नेत्यांना मैदानात उतरवले होते. त्यामुळे या पोटनिवडणूकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कसबा पेठ कुणाची?
कसबा पेठ आणि चिंचवड या पोटनिवडणूकीसाठी 26 फेब्रुवारीला मतदान पार पडलं होतं. कसबा पेठ मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक (Mukta Tilak) आणि चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) यांच्या निधनानंतर येथे पोटनिवडणूक होणार आहे. यात कसब्यात दुहेरी तर चिंचवडमध्ये राहुल कलाटे (Rahul kalate) यांच्या उमेदवारीमुळे तिहेरी लढत झाली. त्यामुळे आज मतदानाचे पेटार खुलताच कुणाच्या अंगावर गुलाल पडणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गिरीश बापट (Girish Bapat) यांनी 1995 पासून 2019 पर्यंत कसबा पेठ मतदारसंघावर एकहाती वर्चस्व राखले. तर पुढे मुक्ता टिळक यांनीही कसबा पेठ आपल्या ताब्यात ठेवला. मात्र मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर या पोटनिवडणूकीत महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी भाजपचा घाम काढला आहे.
कसब्यातील काय आहेत समीकरणे
कसबा पेठमध्ये बाजीराव रस्त्याच्या पश्चिमेला भाजपचा प्रभाव असलेला पारंपरिक मतदार आहे. तर पुर्व भागात काँग्रेसची (Congress) ताकद मोठी आहे. मात्र गिरीश बापट यांनी दोन्ही भागात आपला प्रभाव निर्माण केला होता. त्यानंतर मुक्ता टिळक यांनीही आपला मतदारसंघ कायम जपला. त्यातच या पोटनिवडणूकीत मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर टिळक कुटूंबियांना उमेदवारी न दिल्याने टिळक कुटूंबियांसह ब्राम्हण समाज नाराज झाला होता. त्यामुळे हिंदू महासभेचे उमेदवार आनंद दवे यांनी उमेदवारी दाखल केली असली तरी ब्राह्मण समाज दवे (Anand Dave) यांच्या पाठीशी उभा राहण्याची शक्यता कमी आहे.
रवींद्र धंगेकर यांनी गिरीश बापट यांना फोडला होता घाम
2009 च्या विधानसभा निवडणूकीत गिरीश बापट यांच्या विरोधात रवींद्र धंगेकर यांनी निवडणूक लढवली होती. तर या निवडणूकीत धंगेकर यांचा आठ हजार मतांनी पराभव झाला होता. मात्र धंगेकर हे गिरीश बापट यांचे कट्टर विरोधक असले तरी सध्याची परिस्थिती धंगेकर यांच्या पथ्यावर पडण्याची शक्यता आहे.
ब्राह्मण फॅक्टर महत्वाचा ठरणार
पुण्यातील कसबा पेठ या पोटनिवडणूकीत ब्राह्मण समाजाच्या टिळक कुटूंबियांना उमेदवारी न दिल्याने ब्राह्मण समाज नाराज असल्याची चर्चा रंगली होती. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी टिळक कुटूंबियांची आणि ब्राह्मण समाजाच्या नेत्यांची भेट घेत वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे हा भाजपचा पारंपरिक मतदार काय भूमिका घेतोय? त्यावर कसब्याचे गणित अवलंबून असणार आहे.
रवींद्र धंगेकर विरुध्द रासने यांना 50-50 % संधी
मतदानाच्या दोन दिवस आधीपर्यंत रवींद्र धंगेकर यांचे पारडे जड मानले जात होते. मात्र प्रचाराच्या अखेरच्या दिवशी भाजपने पुण्यश्वराचा मुद्दा काढून हिंदूत्ववादी मतांना साद घातली. त्यानंतर ही निवडणूक धर्माच्या मुद्द्यावर गेली. तर मतदानानंतर भाजपचा प्रभाव असलेल्या सदाशिव पेठ, नाना पेठ, रविवार पेठ या भागातून मोठ्या प्रमाणावर मतदान झाले. त्यामुळे या भागातील मतदानाची टक्केवारी भाजपसाठी फायद्याची ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळेच मतदानापुर्वी रवींद्र धंगेकर यांच्या बाजूने झुकलेले पारडे आता 50-50 टक्क्यांवर आले आहे.
महाविकास आघाडीला बसणार बंडखोरीचा फटका
चिंचवड पोटनिवडणूकीत भाजपने आणि राष्ट्रवादीने मोठी ताकद लावली होती. मात्र यामध्ये ठाकरे गटाचे नेते राहुल कलाटे यांनी बंडखोरी केल्याने त्याचा थेट फटका नाना काटे यांना बसण्याची शक्यता आहे. 2019 मध्ये लक्ष्मण जगताप यांनी राहुल कलाटे यांचा 38 हजार 498 मतांनी पराभव केला होता. त्यामुळे लक्ष्मण जगताप यांना टक्कर देणाऱ्या राहुल कलाटे यांनी अपक्ष निवडणूक लढवल्याने त्याचा फटका महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांना बसणार आहे. त्यातच खासदार अमोल कोल्हे (Amol kolhe) यांचे स्टार प्रचारकांच्या यादीत नाव असतानाही त्यांनी या मतदारसंघाच्या प्रचाराकडे पाठ फिरवली. यामागे राहुल कलाटे आणि अमोल कोल्हे यांची मैत्री असल्याचे म्हटले जाते.
सहानुभूतीची लाट ठरणार निर्णायक
लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी अश्विनी जगताप या पोटनिवडणूक लढवत आहेत. त्यामुळे त्यांना सहानुभूतीचा फायदा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
किती मतदार ठरवणार भविष्य?
कसबा पेठमध्ये 16 उमेदवार तर चिंचवडमध्ये 28 उमेदवार रिंगणात होते. त्यासाठी कसबा पेठ मतदारसंघातून 52 टक्के मतदान झाले. मात्र चिंचवडमध्ये 50.47 टक्के मतदान झाले. त्यामुळे हा वाढलेल्या मतांचा टक्का कुणाला लाभदायक ठरणार हे चित्र आज स्पष्ट होणार आहे. मात्र या निवडणूकीत भाजपने बाजी मारली तर आगामी पुणे महापालिका आणि चिंचवड महापालिकेसाठी त्याचा मोठा फायदा होणार आहे. दुसरीकडे या जागा महाविकास आघाडीने जिंकल्या तर त्यांचा आत्मविश्वास वाढण्यासाठी मदत होईल, असं मत राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त केले जात आहे