'शत्रू, भोळसट आणि बहकलेले' कोण?
'शत्रू, भोळसट आणि बहकलेले' कोण? कंगना रणौत आणि विक्रम गोखले यांची वक्तव्य अशीच आली आहेत का? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दुसरे सरसंघचालक, माधव गोळवलकर यांच्या दृष्टीकोनातून खरे देशभक्त कोण? गांधीजींना तोंडदेखलं नमन करायचं आणि नथूरामच्या समर्थकांना पाठिशी घालायचं हा उपद्व्याप कोण करतंय वाचा ज्येष्ठ पत्रकार सुनिल तांबे यांचं विश्लेषण
भारताला स्वातंत्र्य ९९ वर्षांच्या भाडेपट्ट्याने मिळालं आहे, असं विधान भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाच्या कार्यकर्तीने-- रुची पाठकने ऑक्टोबर महिन्यात केलं.
कंगना रानावत नोव्हेंबर महिन्यात म्हणाली की, भारताला भीक म्हणून स्वातंत्र्य मिळालं. खरं स्वातंत्र्य २०१४ साली मिळालं. विक्रम गोखले यांनी कंगना रानावत यांच्या सूरात सूर मिसळला.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दुसरे सरसंघचालक, माधव गोळवलकर यांचं 'आम्ही कोण?' हे पुस्तक १९३९ साली प्रकाशित झालं. ते सरसंघचालक बनले १९४० साली.
सदर पुस्तकात गोळवलकर म्हणतात-
"हिंदू राष्ट्राला त्याच्या सध्याच्या मोहनिद्रेतून मुक्त करून त्यामध्ये चैतन्य ओतणार्या आणि त्याची पुनर्रचना करणार्या चळवळी या देशात असतील तेवढ्याच राष्ट्रीय चळवळी होय. आणि हिंदू वंशाला आणि राष्ट्राला चिरवैभवशाली करण्यासाठी महत्वाकांक्षा उराशी बाळगून ज्यांनी या कार्यक्षेत्रात उडी घेतली असेल आणि ते ध्येय्य गाठण्यासाठी चिरंतन धडपड करत असतील तेच खरे देशभक्त होतं. बाकीचे सारे राष्ट्रीय उत्कर्षाचे शत्रू, भोळसट नाहीतर बहकलेले."
रा.स्व. संघ, भाजप यांच्यासाठी गांधीजी, नेहरू, सरदार पटेल, नेताजी बोस, भगतसिंग, बाबासाहेब आंबेडकर, पेरीयार नायकर इत्यादी सारे राष्ट्रीय उत्कर्षाचे शत्रू, भोळसट नाहीतर बहकलेले ठरतात. ही बाब गोळवलकरांनी स्वातंत्र्यापूर्वीच सुस्पष्टपणे मांडली आहे.
त्यांच्याच मांडणीचे पडसाद भाजप-संघ यांचे पदाधिकारी, कंगना रानावत, विक्रम गोखले यांच्या वक्तव्यातून उमटत आहेत.
गांधीजींना तोंडदेखलं नमन करायचं आणि नथूरामच्या समर्थकांना पाठिशी घालायचं हा उपद्व्याप पंतप्रधानच करत आहेत.
कंगना रानावत, विक्रम गोखले यांच्याकडे दुर्लक्ष करा. असा उपदेश वा सल्ला अनेक 'भोळसट' देतात.
निवडणुकीच्या राजकारणात अडचणीत येऊ वा शिवसेनेसारख्या हिंदुत्ववादी पक्षाला कशाला दुखावा म्हणून अनेक चतुर लोक कंगना वा विक्रम गोखले यांच्यावर कारवाई करण्यापासून दूर राहातात. केवळ मागणी करतात. गोळवलकर गुरुजींच्या व्याख्येनुसार हेही भोळसटच.
अशा भोळसटांचा फॅसिस्टांपुढे निभाव लागणं शक्य नाही.
सर्व लोकशाही संस्था-- संसद, निवडणूक आयोग, कॉम्प्ट्रोलर जनरल ऑफ इंडिया वा कॅग, एन्फोर्समेंट डायरोक्टेरेट, सीबीआय, इन्कम टॅक्स, पोलीस (मुंबई पोलीस आयुक्तांचा कसा वापर करून घेतला ही बाब समोर आलीच आहे), प्रशासन, इत्यादींमध्ये संघाने शिरकाव करून मोक्याची पदं बळकावली आहेत. गोदी मिडिया साथीला घेऊन भारतातील स्वातंत्र्य आंदोलनाच्या विचारधारेची नाकेबंदी करण्यात आली आहे.
परंतु 'भोळसटांना' त्याचं गांभीर्य समजलेलं नाही. आपल्या हातात सत्ता असूनही ट्विटर, फेसबुक, सोशल मिडिया, पत्रकार परिषदा घेऊन आपण हिंदू राष्ट्रवाद्यांना जरबेत ठेवू असं या 'भोळसटांना' वाटत आहे