Kalyan Crime News:कल्याणमध्ये भाजप व शिंदे गटात राडा! पोलीस ठाण्यातच भाजप आमदार गणपत गायकवाड यांचा महेश गायकवाड वर गोळीबार

Kalyan Crime News : जुन्या वादातून हिललाईन पोलिस ठाण्यात पोलिसांसमोरच गायकवाडांनी चार गोळ्या झाडल्या

Update: 2024-02-03 02:08 GMT

उल्हासनगर येथे भाजप आणि शिवसेनेच्या शिंदे गटात मोठा राडा झाला आहे. भाजप आमदार गणपत गायकवाडांनी शिंदे गटाच्या कल्याण शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला आहे. उल्हासनगर येथील हिललाईन पोलिस ठाण्यात पोलिसांसमोरच त्यांनी हा गोळीबार केल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, घटना घडल्यानंतर आमदार गायकवाड पोलिसांच्या ताब्यात आहेत.




 

कल्याण परिसरातील भाजप आणि शिवसेना यांच्यातील वाद जुना आहे. त्यात गणपत गायकवाड आणि महेश गायकवाड यांच्यातील वैर देखील सर्वश्रुत आहे. त्यांच्यातील हा वाद अधून मधून उफाळून येत असतो. शुक्रवारी देखील दोन्ही गटात असाच वाद झाला. हा वाद थेट पोलिस ठाण्यात गेला. पोलिस ठाण्यात हा वाद मिटवण्यासाठी बैठक सुरू होती. यावेळी आमदार गणपत गायकवाड व शिंदे गटाचे कल्याण शहरप्रमुख व नगरसेवक महेश गायकवाड उपस्थित होते. शांततेची चर्चा सुरू असतांना दोघांमध्ये वाद झाले. हा वाद वाढून टोकाला गेल्याने आमदार गणपत गायकवाड यांनी भर पोलिस ठाण्यात महेश गायकवाड यांच्यावर चार गोळ्या झाडल्या. यात महेश गायकवाड हे गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने दवाखान्यात भरती करण्यात आले आहे. महेश गायकवाड यांच्या हाताला जखम झाली असून दवाखान्याबाहेर शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली आहे.




 

दरम्यान, आमदार गायकवाड (Ganpat Gaikwad) आणि खासदार श्रीकांत शिंदेंचे समर्थक, माजी नगरसेवक महेश गायकवाड हे नातेवाईक आहेत. मात्र त्यांच्यात गेल्या अनेक दिवसांपासून टोकाचा वाद होता. यापूर्वीही त्यांनी जाहीर सभांतून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले होते. टीका टिप्पणीनंतर एकमेकांची उणीदुणी काढण्यापर्यंत हा वाद पोहोचला होता. आमदार गणपत गायकवाड यांची नार्को टेस्ट नव्हे तर सायको टेस्ट करण्याची गरज आहे, अशी टीकाही शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाड यांनी केली होती.

यामागील सत्तेची मस्ती महाराष्ट्र उतरवल्याशिवाय राहणार नाही

या प्रकरणाचा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी तीव्र शब्दात निषेध केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आणखी काही दिवस सत्तेत राहणं म्हणजे महाराष्ट्रा समोरील संकट आहे हे या घटनेवरून सिद्ध होत आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षांवर गोळीबार होत असेल तर सामान्य नागरिकांची काय अवस्था असेल महाराष्ट्रात. असं नाना पटोले यांनी या घटनेचा व्हिडिओ ट्विट करत म्हटले आहे.




Tags:    

Similar News