मोदी सरकारविरोधात विरोधक एकत्र? शरद पवार, के. चंद्रशेखर राव यांच्या बैठकीत चर्चा
देशभरातील विरोधी पक्षांची मोट बांधून केंद्र सरकारला आव्हान देण्यासाठी तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी मोदी सरकारच्या विरोधकांची मोट बांधण्याबाबत चर्चा झाली असल्याची माहिती तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी दिली.
गेल्या काही दिवसांपुर्वी आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांनी राहुल गांधी यांच्याविरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर चंद्रशेखर राव यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधत हे भाजपचे संस्कार आहेत का? असा सवाल केला होता. त्यानंतर चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचे जाहीर केले होते. तर चंद्रशेखर राव यांनी उध्दव ठाकरे यांच्यापाठोपाठ शरद पवार यांची भेट घेत देशातील विरोधकांची मोदी सरकार विरोधात मोट बांधण्यात येणार असल्याची माहिती दिली.
यावेळी चंद्रशेखर राव म्हणाले की, तेलंगणाच्या निर्मीतीमध्ये शरद पवार यांनी महत्वाची भुमिका राहिली आहे. त्यामुळे सर्वात आधी मी शरद पवार यांचे आभार मानतो. तसेच आजच्या बैठकीत जास्त राजकीय चर्चा झाली नाही. मात्र देशात बेरोजगारी, गरीबीचे प्रमाण वाढत आहे. तर विकासाची गती मंदावत आहे. त्यामुळे गरीबी आणि बेरोजगारी विरोधात लढण्यासाठी एकत्र रणनिती ठरवणार आहे. तर लवकरच बारामती येथे विरोधी पक्षांची बैठक होणार असून त्यामध्ये देशासाठी महत्वाचा अजेंडा ठरवण्यात येणार आहे, असे राव यांनी सांगितले.
यावेळी शरद पवार म्हणाले, तेलंगणामध्ये शेतकऱ्यांसाठी महत्वपुर्ण निर्णय घेण्यामध्ये के. चंद्रशेखर राव यांचे महत्वाचे योगदान आहे. तसेच देशापुढील सर्व समस्यांवर आजच्या बैठकीत चर्चा झाल्याचे मत पवार यांनी व्यक्त केले. तसेच भाजपविरोधी पक्षांची मोट बांधण्याबाबत बारामती येथे बैठक घेण्यात येईल असे पवार यांनी यावेळी सांगितले.