फ्रान्समधील चौकशीतून "चौकीदार ही चोर है" हे सिद्ध झालेः नाना पटोले
राफेल विमान खरेदीत प्रचंड मोठा घोटाळा झाल्याचे फ्रान्समधील भ्रष्टाचार प्रतिबंध संस्थेने केलेल्या चौकशीतून उघड झाल्यानंतर काँग्रेसने फ्रान्समधील चौकशीतून चौकीदारही चोर हेै हे सिद्ध झाल्याचा आरोप केला आहे.
राफेल लढाऊ विमान खरेदीत प्रचंड मोठा घोटाळा झाल्याचे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी उघड केले होते. मात्र सातत्याने खोटे बोलून व खोटी कागदपत्रे दाखवून केंद्र सरकारने या घोटाळ्यावर पांघरून घालण्याचे काम केले होते. मात्र राफेल लढाऊ विमान खरेदी करारानंतर डसॉल्ट कंपनीने भारतीय मध्यस्थाला एक दशलक्ष युरोंची लाच दिल्याचे फ्रान्समध्ये सुरु असलेल्या चौकशीतून समोर आले असून चौकीदार ही चोर है हे सिद्ध झाले आहे अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
यासंदर्भात बोलताना नाना पटोले म्हणाले की, भारत आणि फ्रान्समध्ये राफेल लढाऊ विमानांच्या खरेदीबाबत २०१६ मध्ये करार झाला. त्यानंतर डसॉल्टने भारतातील मध्यस्थाला एक दशलक्ष युरो एवढी रक्कम दिली. २०१७ मध्ये डसॉल्ट ग्रुपच्या बँक खात्यातून 'गिफ्ट टू क्लाएंट' म्हणून ही रक्कम ट्रान्सफर करण्यात आली होती. फ्रान्समधील भ्रष्टाचारविरोधी तपास संस्था AFA ने डसॉल्टच्या बँक खात्यांचे ऑडिट केल्यानंतर ही बाब समोर आली आहे. यावरून राफेल खरेदीत मोठा भ्रष्टाचार झाल्याचे सिद्ध झाले आहे. राहुल गांधी व काँग्रेस पक्षाने सातत्याने मागणी केल्याप्रमाणे या खरेदी कराराची संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी केल्यास या प्रकरणाचे सत्य समोर येऊन खरे चोर सापडतील असे नाना पटोले म्हणाले.