लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरु झाली आहे. भाजपाच्या एनडीए युतीविरोधात विरोधकांची एकजूट केली केली आहे. आतापर्यंत इडिया आघाडीची तीसरी तर एनडीएची दुसरी बैठक मुंबईत आयोजित करणार आहे. I.N.D.I.A ची बैठक १ सप्टेंबरला मुंबईतील ग्रँड हयात हॉटेलमध्ये होणार आहे. तर राज्यातील एनडीएची बैठक १ सप्टेंबरलाच आयोजित करण्याची घोषणा करण्यात आली आहे. या बैठकीला शिवसेना शिंदे गट आणि अजित पवारांचा राष्ट्रवादी गट सहभागी होणार आहे.
शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी शरद पवार विरोधी आघाडीच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. तर अजित पवार, एकनाथ शिंदे हे एनडीएच्या बैठकीला जाणार आहेत. अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे यांनी मंगळवारी (२९ ऑगस्ट) ही माहिती दिली आहे. शेकापचे जयंत पाटील आणि स्वाभिमानीचे राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखालील १३ छोटे-मोठे पक्ष आणि सामाजिक संघटनांचा समावेश असलेला 'प्रागतिक विकास मंच' मुंबईत होत असलेल्या इंडिया आघाडी' मध्ये सामील होणार आहे. याचवेळी एनडीएच्या बैठकीत सहभागी ३८ पक्षांपैकी चार पक्ष विरोधी आघाडीच्या संपर्कात असल्याचा दावाही काँग्रेसने केला आहे. ३१ ऑगस्ट ते १ सप्टेंबर दरम्यान होणाऱ्या इंडिया आघाडीच्या बैठकीत नवा लोगोही जाहीर होणार आहे.