पाकिस्तानमध्ये निवडणूक: इम्रान खान यांच्या निर्णयाने राजकीय संकट…
पाकिस्तानमध्ये राजकीय संकट? इम्रान खान यांच्या निर्णयाच्या विरोधात विरोधक सर्वोच्च न्यायालयात;
आर्थिक संकटात असलेल्या पाकिस्तानाला आता पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी राजकीय संकटात नेऊन टाकले आहे. आज पाकिस्तानच्या राष्ट्रीय संसदेत इम्रान खान यांच्या सरकारविरोधात अविश्वास ठराव येणार होता. मात्र, उपसभापती कासिम सूरी यांनी हा ठराव घटनेच्या कलम 5 चे उल्लंघन असल्याचं हा ठराव फेटाळला आहे.
त्यानंतर इम्रान खान यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून संसद विसर्जित करण्याची विनंती पाकिस्तानचे राष्ट्रपती अरिफ अल्वी यांना केली. ही मागणी अरिफ अल्वी मान्य केली आहे. त्यानंतर आता पाकिस्तान मध्ये मोठं राजकीय युद्ध सुरु झालं आहे. पाकिस्तान पीपल्स पार्टी (पीपीपी) चे अध्यक्ष बिलावल भुट्टो जरदारी यांनी इम्रान खान सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव येईपर्यंत पाकिस्तानमधील विरोधी पक्ष नॅशनल असेंब्लीत धरणे आंदोलन करणार आहे.
सरकारने संविधानाचे उल्लंघन केले आहे. अविश्वास ठरावावर मतदान होऊ दिले नाही. एकसंध विरोधी पक्ष संसद सोडणार नाही. आमचे वकील सर्वोच्च न्यायालयात जाणार आहेत. आम्ही सर्व संस्थांना पाकिस्तानच्या संविधानाचे रक्षण, समर्थन, संरक्षण आणि अंमलबजावणी करण्याचे आवाहन करतो. असं बिलावल बुट्टो यांनी म्हटलं आहे.
पाकिस्तान मुस्लिम लीगचे शाहबाज शरीफ यांनी या प्रकरणी पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. ते म्हणाले की, आज पाकिस्तानमध्ये लोकशाहीचा खुलेआम गळा घोटला जात आहे. राज्यघटनेची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींनी या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करावा.
आज पाकिस्तान नॅशनल असेंब्लीच्या कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा सत्ताधारी पक्षाचे सदस्य आणि माहिती व तंत्रज्ञान मंत्री फवाद चौधरी यांनी इम्रान खान सरकारला बाहेरच्या शक्तींच्या इशाऱ्यावर पाडले जात असल्याचा ठराव वाचला. आम्ही उपसभापती कासिम खान सूरी यांच्याकडे मागणी करतो की, राष्ट्रहिताच्या दृष्टीने विरोधकांचा अविश्वास प्रस्ताव फेटाळण्यात यावा. त्यानंतर लगेचच उपसभापती सुरी यांनी प्रस्ताव फेटाळल्याची घोषणा केली.
यासाठी त्यांनी पाकिस्तानच्या राज्यघटनेतील कलम 5 चा संदर्भ दिला. या घडामोडीनंतर पंतप्रधान इम्रान खान यांनी देशाला संबोधित केले आणि सांगितले त्यांनी राज्यपाल आणि राष्ट्रपतींना राष्ट्रीय विधानसभा आणि राज्यांच्या विधानसभा विसर्जित करण्याची शिफारस केली आहे. इम्रान यांनी आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना, समर्थकांना निवडणूकीसाठी तयार राहण्यास सांगितले आहे.
पंतप्रधान इम्रान खान यांनी राष्ट्रपतींना तीन महिन्यांत निवडणुका घेण्यास सांगितले आहे. पाकिस्तानच्या राज्यघटनेतील नियमांचा हवाला देत त्यांनी हे वक्तव्य केले आहे. पण इम्रान खान सरकारच्या देखरेखीखाली तीन महिन्यांत निवडणुका घेण्याचा प्रस्ताव विरोधक मान्य करतील का, हा प्रश्न आहे. तेथील घटनेनुसार अशी परिस्थिती उद्भवल्यास ९० दिवसांत निवडणुका घ्याव्या लागतात.