राष्ट्रपती राजवट लावा, जितेंद्र आव्हाड यांचं ट्वीट व्हायरल

राज्यात भाजपकडून राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली जात असतानाच जितेंद्र आव्हाड यांनी केलेले ट्वीट व्हायरल होत आहे.

Update: 2022-04-25 02:55 GMT

राज्यात भाजप नेत्यांवर झालेल्या हल्ल्यामुळे भाजपकडून राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली जात आहे. त्यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रपती राजवट लावा, असे ट्वीट केले आहे. त्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.

राज्यात भाजप विरुध्द महाविकास आघाडी संघर्ष टोकाला गेला आहे. त्यातच राणा दांपत्याने मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा पठन करण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे राजकीय वातावरण तापले होते. मात्र कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये आणि पंतप्रधान मोदी यांच्या मुंबई दौऱ्याला गालबोट लागू नये, यासाठी राणा दांपत्याने माघार घेतली. मात्र त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. तर त्यांच्यावर देशद्रोहाचा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याबरोबरच दुसरीकडे राणा दांपत्याला अटक केल्यानंतर त्यांना भेटायला गेलेले किरीट सोमय्या यांच्यावर शिवसैनिकांनी हल्ला केला. त्यामुळे राज्यात कायदा सुव्यवस्था नसल्याचा आरोप करत भाजपने राष्ट्रपती राजवटीची मागणी केली आहे. त्यावर ट्वीट करून मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रीया दिली आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करून म्हटले आहे की, राष्ट्रपती राजवट लावा, लै मजा येईल.

किरीट सोमय्या यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, प्रविण दरेकर, चंद्रकांत पाटील आणि आशिष शेलार यांनी राज्यात राष्ट्रपती राजवटीची मागणी केली आहे. त्यावर बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करून म्हटले आहे की, राष्ट्रपती राजवट लावा, लै मजा येईल. त्यामुळे आता राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे.

Tags:    

Similar News