छत्रपती संभाजीनगरमधून महाविकास आघाडी(ठाकरे गट) तर्फे चंद्रकांत खैरे यांची उमेदवारी जाहीर झाली मात्र महायुतीकडून मात्र इथल्या जागेसाठी अजूनही उमेदवार घोषीत करण्यात आलेला नाही. अशातच छत्रपती संभाजीनगरमधून महायुतीकडून निवडणूक लढण्यासाठी इच्छूक असल्याचं विनोद पाटील यांनी म्हटलं आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत त्यांची याविषयी सकारात्मक चर्चा झाली असून संभाजीनगर मधून त्यांनाच उमेदवारी दिली जाईल, असा त्यांना विश्वास असल्याचं त्यांनी सांगितलंय. त्यासाठी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट देखील होती. त्यानंतर आज पुन्हा एकदा मु्ख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी मुख्यमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती दिली.
मुख्यमंत्र्यांकडून उमेदवारी मिळेल असा विश्वास
छत्रपती संभाजीनगर मध्ये तरुणांचे, शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत. गेल्या पंधरा वर्षापासून शहरातला पाणी प्रश्न सुटलेला नाही. शहरात नवीन उद्योग आणायचे आहेत. तरुणांना रोजगार द्यायचा आहे. त्यासाठीच मला ही निवडणूक लढवायची असल्याचे विनोद पाटील यांनी सांगितले. मेरिटच्या आधारावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मला उमेदवारी देतील, असा विश्वास देखील विनोद पाटील यांनी व्यक्त केला आहे.