मी जरी घरात बसत असलो तरी माझे सहकारी मंत्री घराघरात जात आहेत, चांगले काम करत आहेत, माझा त्यांच्यावर विश्वास आहे. मला त्यांचे फोन टॅपिंग करायची गरज नाही, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे. महाविकास आघाडी सरकारला १ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त एका पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. त्या कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह इतरही मंत्री उपस्थित होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी सरकारमध्ये सुसंवाद असून सरकार चांगले काम करत असल्याचा दावा केला. या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसचे मंत्री जास्त सहकार्य करतात असा कोपरखळी देखील लगावली. ३ चाकांच्या या सरकारला जनतेच्या विश्वासाचे चौथे चाक लाभले असल्याने सरकार चांगले काम करत राहिल असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
काय आहे फोन टॅपिंग प्रकरण?
राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांचे फोन तत्कालीन फडणवीस सरकारने टॅप केले होते असा आरोप झाला होता. एवढेच नव्हे तर व्हॉट्सअप मेसेजही टॅप करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप झाला होता. याप्रकरणी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी चौकशीचे आदेशही दिले होते.