भाजप आणि महाविकास आघाडीत आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरु असताना भाजपचे खासदार नारायण राणेंनी आज राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना लक्ष करत महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं नसतं तर जयंत पाटील भाजपात असते, मी लवकरच पाटलांच्या इस्लामपुरात जाऊन भांडाफोड करणार असल्याचे जाहीर केलं आहे.
गेले काही दिवस सातत्याने भाजप आणि महाविकास आघाडीत आरोपप्रत्यारोप सुरु असून माजी मुख्यमंत्री आणि खासदार नारायण राणे आणि त्यांचे कुटुंबिय नितेश आणि निलेश सातत्याने आघाडी सरकारवर तोडंसुख घेत आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं नसतं तर राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील हे भाजपात असते, असा दावा भाजपा नेते नारायण राणे यांनी केला आहे. रत्नागिरीत पत्रकार परिषदेत ते बोलत होते. जयंत पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी नारायण राणे यांच्यावर शेलक्या शब्दांत टीका केली होती.
या टीकेला उत्तर देताना राणे म्हणाले, "आज महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं नसतं तर जयंत पाटील हे भाजपामध्ये असते. भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांशी त्यांची याबाबत बोलणीही झाली होती. पाटलांच्या इस्लामपुरात जाऊन हे सर्व मी उघड करणार आहे."
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी महाविकास आघाडीच्या पदवीधर मतदारसंघातील उमेदवाराच्या प्राचारार्थ बोलताना जयंत पाटील यांनी नारायण राणे यांच्यावर टीका केली होती. राणे सातत्याने सरकारवर टीका करत असल्याबाबत पाटील यांना विचारण्यात आले यावर त्यांनी "गंजलेल्या तोफेतून आलेल्या गोळ्यांना उत्तर द्यायचं नसतं" अशा शब्दांत त्यांची खिल्ली उडवली होती.
महाविकास आघाडी सरकार पडणार असं सांगत भाजपा जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करत आहे. मात्र, आम्ही तर एक वर्षही पूर्ण केलं आहे. त्यामुळे राणेंच्या टीकेला गंभीर्याने घेण्याची गरज नाही, असा टोलाही त्यांनी लगावला होता.