अदानी-पवार भेट; सिल्वर ओक ठरणार राजकीय केंद्रबिंदू ?

हिंडेनबर्गच्या रिपोर्टनंतर वादात सापडलेल्या गौतम अदानी यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे. त्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.

Update: 2023-04-20 09:24 GMT

Gautam Adani-Sharad pawar : हिंडेनबर्गच्या रिपोर्टनंतर (Hindenburg Report) काँग्रेससह विरोधी पक्षांनी अदानी प्रकरणावर संयुक्त संसदीय समितीची (jPC) मागणी केली होती. त्यानंतर शरद पवार (Sharad pawar) यांनी अदानी प्रकरणावर भाष्य करताना हिंडेनबर्गवरच प्रश्न उपस्थित केला. त्यामुळे विरोधी पक्षांच्या एकजूटीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. त्यातच आता थेट गौतम अदानी (Gautam Adani) यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे.

हिंडेनबर्गने रिपोर्ट प्रसिध्द केल्यानंतर अदानी प्रकरणावरून काँग्रेसने पंतप्रधान मोदी यांच्यावर हल्लाबोल केला. एवढंच नाही तर अदानी प्रकरणावर काँग्रेसने संयुक्त संसदीय समितीची मागणी केली होती. मात्र शरद पवार (Sharad pawar on Adani) यांनी अदानी प्रकरणावर बोलताना हिंडेनबर्ग ही देशाबाहेरची संस्था देशातील मुद्द्यांवर अहवाल प्रसिध्द करते. त्यामुळे त्यावर संसदीय समिती नाही तर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमुर्तींच्या समिती स्थापन करण्याची मागणी केली होती. त्यानंतर विरोधी पक्षांची एकजूट फुटण्याची शक्यता वर्तवली जात होती.

मात्र त्यानंतर शरद पवार यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे आणि राहुल गांधी यांची भेट घेतली. यानंतर अदानी प्रकरणावर शरद पवार यांनी भूमिका बदलली होती. विरोधकांची इच्छा असेल तर अदानी प्रकरणाची चौकशी संयुक्त संसदीय समितीद्वारे करावी, असंही शरद पवार म्हणाले होते. त्यापार्श्वभूमीवर गौतम अदानी यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याने चर्चांना उधाण आले आहे.

गौतम अदानी यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याने काँग्रेस काय भूमिका घेणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. तर शरद पवार आणि गौतम अदानी यांच्यात तब्बल दोन तास बंद दाराआड चर्चा झाल्याचं म्हटलं जात आहे.

Tags:    

Similar News