राज्यावर संकट असताना मंत्री अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात व्यस्त- विखे

राज्यातील आघाडीचे सरकार व त्यांचे मंत्री हे कोकण व पश्‍चिम महाराष्ट्रातील संकटात सापडलेल्या नागरिकांना मदत न करता मंत्रालयामध्ये बसवून अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यामध्ये मग्न असल्याची टीका केली;

Update: 2021-08-01 12:14 GMT

राज्यातील आघाडीचे सरकार व त्यांचे मंत्री हे कोकण व पश्‍चिम महाराष्ट्रातील संकटात सापडलेल्या नागरिकांना मदत न करता मंत्रालयामध्ये बसवून अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यामध्ये मग्न असून भ्रष्टाचाराचे विदारक चित्र राज्यामध्ये निर्माण झाले आहे. यामुळे दुःख वाटत असून चीडही निर्माण होत आहे अशी संतप्त प्रतिक्रिया राज्याचे माजी मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी कर्जतमध्ये पत्रकारांशी बोलताना दिली.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्ताने अभिवादन करण्यासाठी राधाकृष्ण विखे पाटील कर्जतमध्ये थांबले होते. यावेळी राज्यातील कोकण व पश्‍चिम महाराष्ट्रातील काही भागांमध्ये नैसर्गिक संकट आले आहे. या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी संवाद साधताना माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, राज्यातील सरकार हे केवळ घोषणा बाबा सरकार आहे. जनतेला यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास राहिलेला नाही. या सरकारकडून आता कोणती अपेक्षा जनता करत नाही. मला मान्य आहे की ही राजकारण करण्याची वेळ नाही परंतु राज्यात विरोधी पक्ष सहकार्य करण्याच्या भूमिकेत असताना देखील या राज्य सरकारमधील काही अपवाद वगळता बहुसंख्य मंत्री सध्या बदल्यांच्या कामांमध्ये मग्न असल्याचे दिसून येते. या बदल्यांच्या प्रकरणामधून ते मोठ्या प्रमाणामध्ये गैरव्यवहार करत असल्याचा आरोप राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावेळी बोलताना केला.

Tags:    

Similar News