महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा लोकसभेचे माजी अध्यक्ष मनोहर जोशी यांचं मुंबईतल्या हिंदुजा रुग्णालयामध्ये ह्रदयविकारामुळे आज पहाटे (23 फेब्रुवारी) 3 च्या सुमारास झाले. गुरूवारी रात्री त्यांना अस्वस्थ वाटत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ICU मध्ये त्यांच्यावर उपचार सुरु असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 86 वर्षाचे होते.
हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू म्हणून मनोहर जोशी यांची ओळख होती. राजकारणापासून गेली बरीच वर्षे ते दूर होते. जोशी हे मार्च 1990 ते डिसेंबर 1991 या कार्यकाळात विधानसभेचे विरोधी पक्षनेते होते, 14 मार्च, इ.स. 1995ते 31 जानेवारी, इ.स. 1999 या काळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. इ.स. 1999 ते इ.स. 2002 या काळात भारतीय केंद्रीय मंत्रिमंडळात ते मंत्री होते, तर इ.स. 2002 ते इ.स. 2004 या काळात लोकसभेचे अध्यक्षही होते. ते शिवसेना या राजकीय पक्षाचे सदस्य होते. असा त्यांचा भारतीय राजकारणात प्रवास राहिला आहे.
आशोक चव्हाण यांची एक्स हँडलवरुन श्रध्दांजली अर्पण -
भाजप नेते आशोक चव्हाण यांनी आपल्या एक्स अकाउंटवरून माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी श्रध्दांजली अर्पण करत ट्विट करत पोस्ट शेअर केली आहे. त्यानी त्यांच्या ट्विटमध्ये असं म्हणाले की, नगरसेवक, महापौर, विधानपरिषद व विधानसभेचे आमदार, राज्यसभा व लोकसभेचे खासदार, केंद्रीय मंत्री, लोकसभा अध्यक्ष व मुख्यमंत्री असा त्यांचा 'गल्ली ते दिल्ली'पर्यंतचा संघर्षमय व प्रदीर्घ राजकीय प्रवास कार्यकर्त्यांच्या नव्या पीढीसाठी प्रेरणादायी व अनुकरणीय आहे.
कला, साहित्य, संस्कृतीवर त्यांचे प्रचंड प्रेम होते. अतिशय व्यस्त दैनंदिनी असलेल्या काळातही आपले हे प्रेम त्यांनी कधी कमी होऊ दिले नाही. अभ्यासू व कुशाग्र बुद्धीमत्ता, फर्डे वक्तृत्व तसेच मार्मिक स्वभावाचे धनी असलेल्या मनोहर जोशी सरांकडे उत्तम संघटन कौशल्य होते. त्यातून त्यांनी आपला एक मोठा चाहता वर्ग निर्माण केला होता. त्यांचे निधन महाराष्ट्राची मोठी हानी आहे.असं म्हणत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.