भाजप आणि काँग्रेस या दोन्हींविरुद्ध एकदिलाने लढा द्या ! ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे आदिवासींना आवाहन

Update: 2023-08-09 06:54 GMT

मुंबई : जागतिक आदिवासी दिनानिमित्त वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी दोन बातम्यांचे स्क्रीनशॉट ट्विट करत भाजप आणि काँग्रेस या दोन्हींविरुद्ध एकदिलाने लढा देण्याचे आवाहन आदिवासी समूहाला केले आहे. या दोन्ही पक्षांमध्ये आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमध्ये आदिवासींची मते मिळविण्यासाठी "सर्वात गोड लॉलीपॉप" देण्याची स्पर्धा लागेल असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

भारतीय ट्राईबल पार्टीला रोखण्यासाठी राजस्थानच्या स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुकीत भाजप आणि काँग्रेस एकत्र आल्याची बातमी, आणि छत्तीसगढ मध्ये आदिवासी आंदोलनाच्या विरोधात काँग्रेसने भाजपचे मॉडेल स्वीकारल्याची बातमी असे दोन बातम्यांचे स्क्रीनशॉट ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट केले आहेत.

भाजप आणि कॉँग्रेसच्या आदिवासीं बद्दलच्या धोरणावर घणाघाती टीका करताना ॲड. प्रकाश आंबेडकर पुढे म्हणाले की, ‘ते मोठ मोठे स्टंट करतील आणि अगदी मोठ्या कलाकारांनाही मागे टाकतील. आज त्यांची राजकीय हाव नेहमीपेक्षा थोडी वेगळी असेल. राजद्रोह कायदा आणि यूएपीए अंतर्गत आदिवासींना नेहमीप्रमाणे अटक करण्याऐवजी आदिवासींची मते ‘अटक’ करण्याची स्पर्धा लागणार आहे. आपल्या भांडवलदार धन्यांच्या जल, जंगल आणि जमिनीच्या स्वार्थासाठी लाखो आदिवासींना आपापल्या राज्य सरकारांमध्ये विस्थापित करण्याऐवजी आज ते एकमेकांना ‘विस्थापित’ करण्याची स्पर्धा करतील.’

भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांचे ‘लॉलीपॉप’ घेऊ नका असं सांगतानाच ‘त्यांच्यासाठी नाचू नका, तर त्यांना तुमच्या तालावर नाचायला लावा. आणि हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा तुम्ही भाजप आणि काँग्रेस या दोन्हींविरुद्ध एकदिलाने लढा द्याल; तुमची ओळख मजबूत करा आणि स्वतंत्र राजकीय आवाज व्हा.’ असे आवाहन ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. 

Tags:    

Similar News