पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल यांच्या प्रतिनियुक्तीवरुन फडणवीसांचा हल्लाबोल

राज्याचे पोलीस महासंचालक सुबोध कुमार जयस्वाल यांच्या बदलीवरुन विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.;

Update: 2020-12-31 08:15 GMT

सरकारच्या कारभाराला कंटाळून डीजी प्रतिनियुक्तीवर गेले असा आरोप फडणवीस यांनी केला आहे. पोलीस महासंचालक सुबोध कुमार जयस्वाल यांची सीआयएसएफ म्हणजेच केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या महासंचालपदी नियुक्ती झाली आहे. त्यामुळे जयस्वाल पुन्हा एकदा केंद्राच्या सेवेत गेले आहेत. ठाकरे सरकारच्या कारभाराला कंटाळून जयस्वाल केंद्रात गेल्याचा गंभीर आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

पोलीस महासंचालकांच्या प्रतिनियुक्तीवरुन हल्लाबोल करताना फडणवीस म्हणाले की, "राज्याला एक कार्यक्षम पोलीस महासंचालक लाभले होते. मात्र गेले अनेक महिने राज्य सरकारचा जसा कारभार चालला, त्यांना विश्वासात न घेता पोलीस विभाग चालवले गेले, हे पहिल्यांदाच घडले, त्यालाच कंटाळून ते राज्य सोडून प्रतिनियुक्तीवर गेले आहेत. पोलिसिंग हे स्वतंत्र विभाग आहे. पोलीस दल गृह विभागाच्या अखत्यारित येत असलं तरी आपण त्याला स्वायत्तता दिली आहे. गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांचं सुपरव्हिजनचं आहे. मात्र आता गृह विभागात छोट्या छोट्या बदलीसाठी हस्तक्षेप सुरु आहे. त्यामुळेच महासंचालकांनी प्रतिनियुक्तीवर जाणं पसंत केलं. हे महाराष्ट्रात पहिल्यांदा घडत आहे. हे राज्याला भूषणावह नाही. पोलीस विभागात लोक येतात, जातात, मात्र नक्कीच पोलीस विभागाच्या मनोबलावर याचा परिणाम होईल." केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने जयस्वाल यांची सीआयएसएफच्या महासंचालकपदी नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे राज्याच्या पोलीस महासंचालक पदासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांमध्ये मोर्चेबांधणी सुरू झाली आहे.

केंद्रातून राज्यात परतल्यानंतर युती सरकारच्या काळात जयस्वाल यांची आधी मुंबई पोलीस आयुक्त आणि

गेल्यावर्षी पोलीस महासंचालकदी नियुक्ती झाली होती. पण राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर गेल्या काही महिन्यांत पोलिसांच्या बदल्या आणि राजकीय हस्तक्षेपावरून महासंचालक जयस्वाल आणि राज्य सरकारमध्ये विशेषत: गृह विभाग यांच्यात विसंवाद निर्माण झाला होता. त्यानंतर त्यांनी केंद्रात जाण्याची मागितलेली परवानगी राज्य सरकारने लगेच मान्य केली होती.

त्यानुसार केंद्र सरकारने भारतीय पोलीस सेवेच्या सन १९८५ च्या तुकडीतील जयस्वाल यांची सीआयएसएफच्या महासंचालकपदी नियुक्ती केली आहे. त्यांचा कार्यकाल हा नियुक्तीपासून ३० सप्टेंबर २०२२ पर्यंत असेल.

महाविकास आघाडीसोबत काम करताना जैसवाल यांनी असहकाराचे धोरण स्विकारले होते. तसेच पोलिसांच्या बदल्या रखडवल्यामुळे पोलिसदलात सरकारविरोधी रोष निर्माण करण्यात जैसवाल यांचा हात होता. फडणवीस यांचे निकटवर्तीय असल्यानेच फडणवीस जैसवलांच्या मदतीला धावले असून आता महाविकास आघाडीतील नेते आणि गृहमंत्री काय उत्तर देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Tags:    

Similar News