ममता बॅनर्जी यांना सर्वात मोठा धक्का, महुआ 'कॅश फॉर क्वेरी' प्रकरणात TMC च्या महुआ मोइत्रा यांची खासदारकी रद्द
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना मोठा झटका बसला आहे. त्यांच्या खासदार महुआ मोइत्रा यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. संसदेत प्रश्न विचारण्यासाठी पैसे घेतल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला होता. या प्रकरणी चौकशी समितीही नेमली होती. या समितीने अहवाल दिला होता. त्यात त्या दोषी आढळल्या. या प्रकरणावर आज संसदेत चर्चा झाली आणि मोइत्रा यांची खासदारकी रद्द करण्यात आली.;
तृणमूल काँग्रेसच्या नेत्या महुआ मोइत्रा यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. संसदेच्या एथिक्स पॅनलने कॅश फॉर क्वेरी प्रकरणात (संसदेत प्रश्न विचारण्यासाठी पैसे घेण्याच्या आरोपात) दोषी ठरवले होते. तसेच खासदारकी रद्द करण्याची शिफारस केली होती. त्यानुसारच, त्यांची ही खासदारकी रद्द करण्याचा निर्णय लोकसभा अध्यक्षांनी घेतला आहे.
आज लोकसभेत समितीचा अहवाल सादर करण्यात आला. संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी एथिक्स समितीच्या रिपोर्टवर अॅक्शन घेण्यासाठी प्रस्ताव मांडला. महुआ यांच्यावर पैसे घेऊन प्रश्न विचारल्याचा आरोप आहे. भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनीच हा आरोप केला होता. या आरोपानंतर महुआ यांनी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेऊन दुबे यांच्यावर अब्रूनुकसानीचा दावा ठोकला होता.
अदानी विरोधात आवाज उठवल्यामुळे शिक्षा - महुआ मोइत्रा
लोकसभा सदस्यत्व रद्द झाल्यानंतर महुआ मोईत्रा संतापल्या. त्यांनी केंद्रातील भाजप सरकारवर जोरदार हल्ला चढवला. 'रोख रक्कम आणि भेटवस्तू घेतल्याचा कोणताही पुराव माझ्याविरुद्ध नाही, हे स्पष्ट झालं होतं. माझ्याविरुद्ध योग्य तपास झाला नाही. आरोप करणाऱ्याला चौकशीसाठी बोलावण्याची तसदीही कुणी घेतली नाही. त्या बिझनेसमनला समितीनं चौकशीसाठी का बोलावलं नाही?, असा सवाल त्यांनी केला.
महुआ मोइत्रा यांच्या विरोधात लोकसभेत प्रस्ताव मंजूर झाला. याआधी सभागृहात चर्चा झाली. यावेळी लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांनी भूमिका स्पष्ट केली. आम्ही न्याय नव्हे तर चर्चा करत आहोत. हे सभागृह न्यायालयासारखं काम करणार नाही. मी नियमानुसार काम करत आहे. माझा तो अधिकार नाही. हा सभागृहाचा अधिकार आहे. सभागृहाला अधिकार नसता तर मी आतापर्यंत निर्णय दिला असता, असं ओम बिरला म्हणाले. तर, कोई आमच्यासोबत असो वा नसो. आपले स्पीकर सोबत आहेत. ते योग्य निर्णय घेतील आणि आम्ही ऐकू, असं काँग्रेस नेते अधीर रंजन म्हणाले.