Shinde Vs Thackeray : अपात्रता प्रकरणी आमदारांची धाकधूक वाढली, विधानसभा अध्यक्षांच्या भूमिकेकडे लक्ष
एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांच्या अपात्रता प्रकरणी सोमवारी सुनावणी होणार आहे. त्यासंदर्भात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ठाकरे आणि शिंदे गटाच्या आमदारांना नोटीस पाठवली आहे.;
एकनाथ शिंदे यांनी 20 जून रोजी बंड केल्यामुळे राज्यात सत्तांतर झाले. मात्र एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्याची मागणी ठाकरे गटाने 24 जून 2022 रोजी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे केली होती. मात्र या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने निर्णय देतांना आमदारांच्या अपात्रता प्रकरणाचा चेंडू विधानसभा अध्यक्षांच्या कोर्टात टाकला. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दोन्ही गटांना कागदपत्रं सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर दोन्ही गटाने कागदपत्र सादर केले. मात्र यावेळी सुनावणीला विलंब होत असल्याचे सांगत ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावले. यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी 14 सप्टेंबर 2023 रोजी आमदारांच्या अपात्रता प्रकरणी सुनावणी घेतली. यानंतर दोन्ही गटाला नोटीस पाठवण्यात आली. मात्र 18 सप्टेंबर 2023 रोजी सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणावर सुनावणी करताना विधानसभा अध्यक्षांनी आठवडाभरात सुनावणी घेऊन पुढील सुनावणीचे वेळापत्रक सादर करण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिले होते. त्यामुळे या सुनावणीकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानंतर सोमवारी दुपारी साडेतीन वाजता सुनावणीची नोटीस पाठवली आहे. यामध्ये ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही नोटीस पाठवण्यात आली असल्याची सुत्रांची माहिती आहे. त्यामुळे सोमवारी दोन्ही गटांकडून दावे-प्रतिदावे करण्यात येणार आहेत. यावेळी ठाकरे गटाची बाजू वकीलांमार्फत मांडण्यात येणार आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांकडून होत असलेल्या विलंबाबाबत नाराजी व्यक्त केल्यानंतर हा निर्णय वेगाने घेण्यात येईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळेच आमदारांची अपात्रता प्रकरणी धाकधूक वाढली आहे.
आमदार अपात्रता प्रकरणी निर्णय नियमानुसारच घेणार- विधानसभा अध्यक्ष
आमदारांच्या अपात्रता प्रकरणावर निर्णय नियमानुसारच घेतला जाईल. कारण घाईगडबडीत निर्णय घेतल्यास अनेक महत्वाचे पैलू दुर्लक्षित राहू शकतात. त्यामुळे या प्रकरणी दोन्ही बाजूंचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर निर्णय देण्यात येईल, असंही विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी म्हटले आहे.
आमदार अपात्रता प्रकरणी निर्णयासाठी विलंब- संजय राऊत
आमदारांच्या अपात्रता प्रकरणी सुनावणी करताना जाणून बुजून विलंब केला जात असल्याची टीका संजय राऊत यांनी केली आहे. एवढंच नाही तर सर्वोच्च न्यायालयाचाही सन्मान केला जात नाही. विधानसभा अध्यक्षांनी तातडीने निर्णय घेऊन राज्यातील जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे.
सुनावणीचे लाईव्ह प्रक्षेपण करा- विजय वडेट्टीवार
16 आमदारांच्या अपात्रता प्रकरणावर सुनावणी घेतांना ती लाईव्ह प्रक्षेपित करावी. ज्यामुळे सामान्य लोकांना संविधानिक संस्थांवरचा विश्वास कायम राहील, असं मत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केले आहे.
अध्यक्षांना वाटेल तो ते निर्णय घेतील- गुलाबराव पाटील
विरोधी पक्षांकडून टीका केली जात असली तरी विधानसभा अध्यक्षांना वाटेल तो निर्णय घेतील, असं मत मंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केले आहे.