राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे हे EDच्या कार्यालयात चौकशीला सामोरे जाण्यासाठी दाखल झाले आहेत. खडसेंच्या जावयाला दोन दिवसांपूर्वी अटक झाली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ खडसे यांना राष्ट्रवादीत सन्मानाने प्रवेश दिल्याने चिडून जाऊन भाजप केंद्रीय एजन्सीचा गैरवापर केला असल्याचा आरोप राष्ट्रवादीते प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे. एकनाथ खडसे हे निर्दोष आहेत. त्यांनी चुकीचं काही केलेलं नाही. त्यामुळे चौकशीतून ते बाहेर येतील असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे.
एकनाथ खडसे यांच्यावर ज्या विषयावरुन कारवाई सुरू आहे त्यात अद्याप तथ्य आढळलेले नाही. किंवा कोणतेही आरोप सिद्ध झालेले नाही. एक जागा त्यांनी रितसर घेतली त्याबाबत निर्णय झालेला आहे. चौकशी समितीलाही त्यात काही चूक आढळली नाही. पण त्यामध्ये कुभांड रचून या सर्व एजन्सीमार्फत राजकीयदृष्टया अडचणीत आणण्याचा प्रयत्न भाजप करत आहेत असा आरोप जयंत पाटील यांनी केला आहे. एकनाथ खडसे यांना भाजपमध्ये फार वाढू दिले गेले नाही. ओबीसी नेतृत्वाला बाजुला करण्यात आले असा आरोपही जयंत पाटील यांनी यावेळी केला आहे.