एकनाथ खडसे यांना जोरदार धक्का; 10 नगरसेवकांचा उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित प्रवेश
एकनाथ खडसे यांना जोरदार धक्का; 10 नगरसेवकांचा उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित प्रवेश Eknath Khadse Supporters Corporator Joins Shiv Sena in the presence of cm Uddhav Thackeray
दोन महिन्यांपूर्वीच एकनाथ खडसे समर्थकांचा मुक्ताईनगर चे ६ नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश करून शिवसेनेने माजी मंत्री खडसे यांना जबरदस्त झटका दिला होता. त्यातच आज पुन्हा दुसऱ्यांदा शिवसेनेने माजी मंत्री खडसेंवर धक्का तंत्र वापरले असून बोदवड नगरपंचायतच्या नगराध्यक्षा मुमताज बी सईद बागवान यांच्यासह 10 नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश करून घेतला आहे. हा प्रवेश सोहळा मातोश्री येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पार पडला.
यावेळी राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार चंद्रकांत पाटील तसंच शिवसेना तालुका प्रमुख छोटू भोई, विधानसभा क्षेत्रप्रमुख सुनील पाटील हे नेते उपस्थित होते.
'या' खडसे समर्थक नगरसेवकांनी घेतला प्रवेश
बोदवड नगरपंचायतीत खडसे गटाला खिंडार पाडत शिवसेनेने नगराध्यक्षा मुमताजबी सईद बागवान, देवेंद्र समाधान खेवलकर (प्र.क्र.३ राष्ट्रवादी गटनेता तथा नगरसेवक), आफरिन सय्यद असलम बागवान (प्र.क्र.४ नगरसेविका), सुशीलाबाई मधुकर खाटीक (प्र.क्र.५ नगरसेविका), अकबर बेग मिर्झा (प्र.क्र.८ नगरसेवक), सुशिलाबाई आनंदा पाटील (प्र.क्र.९ नगरसेविका), नितीन रमेश चव्हाण (प्र.क्र.११ नगरसेवक), सुनील कडू बोरसे (प्र.क्र.१२ नगरसेवक), साकीनाबी शे.कलिम कुरेशी (प्र.क्र.१४ नगरसेविका), आसमाबी शे.इरफान (प्र.क्र.१५ नगरसेविका) यांना शिवसेनेत जाहीर प्रवेश दिला असून सर्व शिवबंधनात आले आहेत.
मुक्ताईनगर येथील दुसरा गटनेता देखील गळाला...
काही महिन्यांपूर्वी मुक्ताईनगर नगरपंचायतीत खडसे यांनी स्थापन केलेल्या निर्विवाद सत्तेला सुरुंग लावत शिवसेनेने भाजप गटनेत्यांसह तब्बल ६ नगरसेवकांना शिवसेनेत प्रवेश दिला होता. हा प्रवेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच दिला होता. यानंतर खडसे यांनी कोणीही आपल्याला सोडून गेले नसल्याचा दावा केला होता व ओळख परेड करीत त्यांनी नगरसेवक त्यांच्या ताब्यात असल्याचा दावा केला होता.
शिवसेनेत प्रवेश केलेल्या गटनेत्याच्या जागेवर निलेश प्रभाकर शिरसाठ यांची निवड माजी मंत्री खडसे यांनी केली होती. या घडामोडींना अवघे काही दिवस उलटत नाही तोच शिवसेनेने खडसे समर्थक असलेला दुसरा गटनेता देखील आता गळाला लावला असून बोदवड नगरपंचायत प्रवेशासह गटनेता निलेश प्रभाकर शिरसाठ यांनी देखील शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. त्यांना देखील मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी शिवबंधन बांधले.
शिवसेनेचे बोदवड व मुक्ताईनगरात पक्षीय बलाबल झाले 10 :10
आज बोदवड येथील नगराध्यक्षा सह 9 नगरसेवक असे एकूण 10 सत्ताधारी शिवसेनेत सामील झाले आहेत. तर मुक्ताईनगर नगरपंचायतीत शिवसेनेचे अधिकृत 3 नगरसेवक निवडून आलेले होते व भाजपचे (खडसें समर्थक) सहा नगरसेवकांनी या आधी प्रवेश केला होता. यामुळे एकूण 17 पैकी 9 पक्षीय असे बहुमताचे बलाबल शिवसेनेचे येथे झाले होते. आता निलेश शिरसाठ यांच्या प्रवेशाने शिवसेनेचे मुक्ताईनगर नगरपंचायतीतील पक्षीय बलाबल 10 वर आलेले आहे. यामुळे मुक्ताईनगर व बोदवड या दोघे नगरपंचायतीचा विचार करता शिवसेनेचे 10 :10 सदस्य झाले आहेत.