वाद रंगला; चंद्रकांत पाटील राष्ट्रवादीच्या पाठींब्याने आमदार, एकनाथ खडसे यांचा आरोप; चंद्रकांत पाटील यांनीही दिले प्रत्युत्तर
जळगाव जिल्ह्यात चंद्रकांत पाटील विरुध्द एकनाथ खडसे संघर्ष रंगला आहे. त्यातच एकनाथ खडसे यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर राष्ट्रवादीच्या पाठींब्याने आमदार झाल्याची टीका केली आहे. त्याला चंद्रकांत पाटील यांनी उत्तर दिले आहे.;
जळगाव जिल्ह्यात गिरीश महाजन विरुध्द एकनाथ खडसे संघर्ष रंगला आहे. तर या संघर्षाच्या पार्श्वभुमीवर गिरीश महाजन यांचा चंद्रकांत पाटील यांनी सत्कार केल्यामुळे एकनाथ खडसे यांनी आमदार चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली आहे.
एकनाथ खडसे म्हणाले, आमदार चंद्रकांत पाटील यांनी निवडणुकीपूर्वी पुर्ण तापी नदीवर पुल बांधून देईल याची घोषणा केली होती. मात्र निवडून आल्यानंतर त्यांनी हे आश्वासन अजूनही पुर्ण केले नाही. तसेच चंद्रकांत पाटील यांनी जाहीरपणे ते शिवसेनेचे आमदार असल्याचे लिहून द्यावे. कारण एकीकडे चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला बेडूक म्हटले आहे. तर दुसरीकडे शिवसेनेचे आमदार असलेले चंद्रकांत पाटील यांनी गिरीश महाजन यांचा चौकात सत्कार केला आहे. त्यामुळे यांची अस्मिता कुठे आहे? असा प्रश्न निर्माण होतो.
शिवसेनेच्या अस्मितेविषयी कोणताही शिवसैनिक बोलत नाही. परंतू मी गिरीश महाजन यांचा निषेध करतो, असे एकनाथ खडसे म्हणाले. तसेच यावेळी चंद्रकांत पाटील यांना निवडून येण्यासाठी राष्ट्रवादीने पाठींबा दिला होता, हे सुध्दा त्यांनी विसरु नये, असा टोला एकनाथ खडसे यांनी लगावला. तसेच चंद्रकांत पाटील यांनी विकासकामांना स्थगिती दिल्याचा गंभीर आरोप एकनाथ खडसे यांनी केला.
चंद्रकांत पाटील यांचे प्रत्युत्तर
एकनाथ खडसे यांनी केलेल्या आरोपानंतर शिवसेना आमदार चंद्रकांत पाटील म्हणाले की, मी कोणत्याही प्रकारच्या विकासकामांना स्थगिती दिली नाही. तसेच मी महाविकास आघाडीचा घटक आहे. त्यामुळे मी कोणाशीही गद्दारी केली नाही. याबरोबरच राष्ट्रावादीचे प्रमुख शरद पवार यांनी मला पाठींबा दिला त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो, अशी प्रतिक्रीया चंद्रकांत पाटील यांनी दिली.
पुढे बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, जेव्हा शरद पवार यांनी मला पाठींबा दिला तेव्हा तुम्ही कुठे होता? असा सवाल उपस्थित केला. तर तुम्ही बारा खात्याचे मंत्री असताना मुक्ताईनगर तालुक्यासाठी किती निधी आणला, हे एकदा स्पष्ट करावे. कारण विकासकामांमध्ये अडथळा आणणे हे करंटेपणाचे लक्षण असते, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी एकनाथ खडसे यांना लगावला.