इंदिरा गांधींप्रमाणे मोदींचंही व्हावं अशी अपेक्षा करत आहात का? चंद्रकांत पाटील यांचा सवाल
मुंबई- पंजाब विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर झालेल्या पंतप्रधानांच्या सुरक्षेतील त्रुटीच्या मुद्द्यावरून भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेसवर टीकास्र सोडले. तर माजी पंतप्रधान इंदिरा गांधींचे जे झाले ते मोदींचेही व्हावं, अशी अपेक्षा आहे का? असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना केला.
पंतप्रधानांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरून आरोप प्रत्यारोप सुरू असतानाच पाटील यांनी मुंबईतील मुंबादेवीच्या मंदिरात जाऊन मोदींच्या दीर्घआयुष्यासाठी प्रार्थना केली. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलतांना त्यांनी नाना पटोले यांच्यावर जोरदार टीका केली.
बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी पंजाब दौऱ्यावर होते. यादरम्यान भटिंडा विमानतळापासून फैजपुरच्या दिशेने जात असताना भारतीय किसान युनियनने निदर्शने करत पंतप्रधानांचा ताफा उड्डाणपुलावरच अडवला. तर तब्बल 20 मिनिटे पंतप्रधानांचा ताफा उड्डाणपुलावर अडकून पडला होता. त्यामुळे पंतप्रधानांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरून भाजपाने काँग्रेसला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यावरून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. तर पंजाबमध्ये भाजपाकडून राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे.
दरम्यान पंतप्रधानांचा ताफा उड्डाणपुलावर अडकून पडल्यानंतर महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंजाबमध्ये जे काही झाले ते नौटंकी असल्याचे म्हटले होते. तर इंदिरा गांधी आणि मोदींची तुलना होऊच शकत नसल्याचे नाना पटोले यांनी म्हटले होते. यावरून चंद्रकांत पाटील यांनी संतप्त होत इंदिरा गांधींचे जे झाले ते मोदींचे व्हावे अशी अपेक्षा आहे का? असा सवाल केला. तर आपण काय बोलतो, त्याचा अर्थ काय लागतो याचा आपल्याला तरी पत्ता असतो का? असे म्हणत नाना पटोले यांच्यावर निशाणा साधला. तर चंद्रकांत पाटील पुढे बोलताना म्हणाले की, नौटंकी तर तुम्ही करत आहात. विधानसभाध्यक्षपदाचा राजीनामा देता, प्रदेशाध्यक्ष होता, मंत्रीमंडळात सहभागी होण्याची इच्छा व्यक्त करता, असे म्हणत पटोले यांना टोला हाणला.