वंचित महाविकास आघाडीत ? शरद पवार यांचं मोठं वक्तव्य

वंचित बहुजन आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरु असतात. त्यातच आता शरद पवार यांनी वंचितबाबतच्या युतीवर मोठं भाष्य केलं आहे.

Update: 2023-05-09 07:52 GMT

वंचित बहुजन आघाडी आणि ठाकरे गटाची युती झाल्यानंतर वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीसोबत जाणार का? असा सवाल उपस्थित केला जात होता. त्यातच प्रकाश आंबेडकर यांनी अनेकदा शरद पवार यांच्यावर निशाणा साधला होता. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र येण्याविषयी राजकीय विश्लेषक साशंक होते. मात्र कर्नाटकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि वंचित बहूजन आघाडीने एकत्र येण्याचा निर्णय घेतल्याने महाराष्ट्रातही वंचित आणि राष्ट्रवादी येण्याविषयी चर्चा सुरु झाली होती. त्यातच आता थेट शरद पवार यांनी या आघाडीसंदर्भात भाष्य केलं आहे.

यावेळी शरद पवार म्हणाले, जागावाटप कसे होणार याबाबत महाविकास आघाडीत अद्याप चर्चा केलेली नाही. माविआच्या सर्व घटक पक्षांशी बोलून वंचित बहुजन आघाडीबाबत निर्णय घेतला जाईल, असे शरद पवार यांनी सांगितले. त्यामुळे विधानसभा निवडणुकीसाठी माविआ वंचित बहुजन आघाडीशी हातमिळवणी करणार का? याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

दुसरीकडे शरद पवार यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर जोरदार टीका केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस भाजपच्या संपर्कात असून, ते किती दिवस आमच्यासोबत राहणार हे माहीत नाही, असे चव्हाण म्हणाले होते. चव्हाण यांनी केलेल्या वक्तव्याची शरद पवारांनी चांगलीच दखल घेतली आहे. पृथ्वीराज चव्हाण यांच्या काँग्रेसमधील स्थितीवर शरद पवारांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

Tags:    

Similar News