राजकारणाच्या फडात बैलगाडा शर्यत ; शर्यतीच्या वादात देवेंद्र फडणवीस यांची उडी

बैलगाडा शर्यती सुरू करण्यासाठी लोकांचा दबाव वाढत असताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या वादात उडी घेतली आहे.हे सरकार काही करत नाही असा आरोप त्यांनी केला आहे.;

Update: 2021-08-17 15:14 GMT

बैलगाडा शर्यती सुरू करण्यासाठी लोकांचा दबाव वाढत असताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या वादात उडी घेतली आहे. आमच्या सरकारने कायदा केला होता. पण तो सुप्रीम कोर्टाने स्थगित केला. पण महाविकास आघाडीचं सरकार आल्यापासून हे सरकार काही करत नाही असा आरोप त्यांनी केला आहे.

ग्रामीण भागात बैलगाडा मालक एकवटले असून बैलगाडा शर्यती सुरू करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांवर त्यांनी दबाव आणायला सुरवात केली आहे. पुण्यातील शिरूर येथील बैलगाडा मालक संघटनाची नुकतीच एक बैठक झाली. या बैठकीचं नियोजन राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी केलं होतं. बैठकीला शिवाजीराव आढाळराव पाटील यांनाही निमंत्रित करण्यात आलं होतं. बैलगाडा शर्यतीवर बंदी आल्यापासून बैलाची खिलार ही जमात नष्ट होत असून ग्रामीण भागातील अनेक व्यवसायांवर त्याचा परिणाम होत असल्याचं अमोल कोल्हे यांनी सांगितलं.

परदेशातील बुलफाईट सुरू असते पण नियम पाळून केली जाणारी बैलगाडा शर्यती बंद झाल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. बैलांना गाडा मालक मुलासारखं जपतात. त्याची देखभाली साठी मोठा खर्च करतात मग ते आपल्या बैलाला क्रुरपणे कसे वागवतील असा सवालही त्यांनी केला. केंद्र सरकारकडे यासाठी पाठपुरावा सुरू असून राज्य सरकारच्या पातळीवरही प्रयत्नं सुरू असल्याचं ते म्हणाले.

दुसरीकडे शिवाजीराव आढाळराव पाटील हे बैलगाडा शर्यती सुरू रहावी यासाठी आग्रही आहेत. बैलगाडा शर्यती ही आता नुसती शर्यत राहीली नाही ती यात्रेतील बाराबलुतेदारांच्या रोजगाराचं साधन बनली आहे असं ते म्हणाले. बैलगाडा शर्यती बंद झाल्याने बैलाना किंमत कमी येते आणि ते विक्रिसाठी जातात असंही त्यांनी सांगितलं. ग्रामीण भागात बैलगाडा शर्यत सुरू व्हावी यासाठी गावक-यांनी राजकारण्यांवर दबाव टाकायला सुरवात केली आहे.

त्यामुळेच भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी बैलगाडा शर्यतीचे आयोजन केलं आहे. त्याला प्रतिसादही चांगला मिळत आहे. विरोधी पक्षनेते फडणवीस यांनीही यावर वक्तव्य करून राजकारणाच्या फडात बैलगाडा शर्यती आणून ठेवली असल्याने आता महाविकास आघाडी काय भूमिका घेते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Tags:    

Similar News