त्यांनी दुसऱ्यांना अच्छे दिन सांगावे म्हणजे..., उध्दव ठाकरे यांच्या सभेवर देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रीया

कोरोनानंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दुसऱ्या जाहीर सभेला संबोधित केले. या सभेत मनसे आणि एमआयएमवर टीका न करता उध्दव ठाकरे यांनी थेट भाजपवर टीका केली. त्यावर विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रीया दिली आहे.

Update: 2022-06-09 02:45 GMT

कोरोनानंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मुंबईबाहेर पहिलीच जाहीर सभा घेतली. या सभेत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला. तसेच औरंगाबादचे नाव संभाजीनगर कधी करणार याविषयीही भाष्य केले. तसेच उध्दव ठाकरे यांनी मी आजच्या सभेत पाणीप्रश्नावर बोलणार असल्याचे सांगत विरोधकांचा समाचार घेतला.

भाजपने काढलेल्या आक्रोश मोर्चावर उध्दव ठाकरे यांनी टीका करताना म्हटले की, तुमचं सरकार असताना तुम्ही हा प्रश्न का सोडवला नाही, असा सवाल केला. तसेच संभाजीनगरचा पाणीप्रश्न सोडवण्यासाठी मी 1700 कोटी रुपये मंजूर केले. एवढंच नाही तर औरंगाबाद शहरातील रस्ते आणि पाण्याचा प्रश्न सोडवल्याशिवाय जर नामांतर केलं तर संभाजी महाराज मला टकमक टोक दाखवतील. त्यामुळे पाणी आणि रस्त्याचा प्रश्न सोडवल्यानंतरच औरंगाबादचे नामांतर करू असे उध्दव ठाकरे म्हणाले.

देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत बोलताना बाबरी मशीद पाडण्यासाठी मी गेलो होतो, असा दावा केला होता. मात्र त्यावर उध्दव ठाकरे यांनी फडणवीस यांचा समाचार घेतला. तसेच त्यानंतर फडणवीस यांनी बाबरी पाडण्यासाठी शिवसेनेचे कोणीही शिवसैनिक नसल्याचे म्हटले होते. त्यावर बोलताना उध्दव ठाकरे म्हणाले की, सध्या भाजपमध्ये असलेले अतुल सावे यांनी सांगावे की त्यांचे वडील मोरेश्वर सावे हे बाबरी पाडण्यासाठी नव्हते का? असा सवाल उपस्थित केला.

त्याबरोबरच आक्रोश करायचा असेल तर काश्मीरमध्ये काश्मीरी पंडितांची हत्या होत आहे. त्यावर आक्रोश करा, असे उध्दव ठाकरे म्हणाले. यावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

उध्दव ठाकरे यांची सभा संपल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करून प्रत्युत्तर दिले आहे. त्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे की, बांधावरची मदत ज्यांना स्मरत नाही, पेट्रोल-डिझेलचे दर जे स्वत: कमी करीत नाही, त्यांनी दुसर्‍यांना 'अच्छे दिन' सांगावे, म्हणजे लोका सांगे ब्रम्हज्ञान आणि...! असा टोला लगावला आहे.

तसेच पुढे म्हणाले आहेत की, माझे पुन्हा सवाल आहेत, शेतकर्‍यांना मदत केव्हा करणार? पेट्रोल-डिझेलचे दर केव्हा कमी करणार? याबरोबरच संभाजीनगरचे नामकरण, पाण्याचा प्रश्न, रस्त्यांचे प्रश्न, विकासाची एखादी नवीन योजना... काही तरी ठोस मिळेल, अशी उगाच त्यांची अपेक्षा होती. पण, संभाजीनगरवासियांना मिळाले काय तर पुन्हा एकदा टोमणे आणि फक्त टोमणे, अशी प्रतिक्रीया देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.

Tags:    

Similar News