'ते' नळातून येणाऱ्या हवेलाच पाणी समजा म्हणतील, देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्र्यांना टोला
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकींच्या पार्श्वभुमीवर भाजप विरुध्द महाविकास आघाडी संघर्ष तीव्र झाला आहे. त्यातच मुंबईतील सभेत मुख्यमंत्र्यांनी औरंगाबागच्या नामांतरावर केलेल्या वक्तव्यावरून देवेंद्र फडणवीस यांनी उध्दव ठाकरे यांना टोला लगावला.
आगामी काळात राज्यातील 16 महापालिकांसह जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूकांचा बिगूल वाजणार आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष एक्टीव्ह मोडवर आले आहेत. त्यातच औरंगाबागच्या पाण्याचा मुद्दा पकडत भाजपने महापालिकेत सत्ताधारी असलेल्या शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. तर याच पाण्याच्या मुद्द्यावर विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी औरंगाबाद येथून थेट मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. ते औरंगाबाद येथे जल आक्रोश मोर्चात बोलत होते.
यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले, मुंबईच्या सभेत बोलताना उध्दव ठाकरे यांनी असे म्हटले होते की, औरंगाबादचे नाव संभाजीनगर कशाला करायचे? औरंगाबादला मी म्हणतो म्हणून संभाजीनगर समजा. आता तेच मुख्यमंत्री म्हणतील की, औरंगाबादला कशाला हवे आहे पाणी. मी म्हणतो म्हणून नळातून येणाऱ्या हवेलाच पाणी समजा, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.
शिवसेनेने पाणी योजनेचा बट्ट्याबोळ केला
पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मागील सरकारच्या काळात मी औरंगाबादसाठी पाणी योजना मंजूर केली होती. त्यावेळी टेंडरच्या वाटमारीत शिवसेनेने पाणी योजनेचा बट्ट्य़ाबोळ केला, असा गंभीर आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला. याबरोबरच जर मी ही पाणी योजना 2050 सालाचा विचार करून मंजूर केली होती. जर ही पाणी योजना पुर्ण झाली असती तर औरंगाबादचा पाणी प्रश्न मिटला असता, असं मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.