मी पुन्हा येईन मध्ये कधी कधी 5 वर्षे जातात बरं का- देवेंद्र फडणवीस
मी पुन्हा येईन या वाक्यावरून देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली जाते. मात्र मी पुन्हा येईन मध्ये कधी कधी पाच वर्षे जातात अशी टिपण्णी देवेंद्र फडणवीस यांनी केली.;
2019 च्या विधानसभा निवडणूकीदरम्यान राज्याचे तात्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचारादरम्यान मी पुन्हा येईन अशी घोषणा दिली होती. मात्र राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर मी पुन्हा येईन घोषणेवरून देवेंद्र फडणवीस यांच्यावर मोठ्या प्रमाणावर टीका केली जात होती. त्याचाच संदर्भ देत चला हवा येऊ द्या कार्यक्रमात मी पुन्हा येईन मध्ये कधी कधी पाच वर्षे जातात, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
देवेंद्र फडणवीस हे पुणे शहरात झालेल्या चला हवा येऊ द्या कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी अभिनेते भाऊ कदम यांनी देवेंद्र फडणवीस यांना पुरणपोळी भेट दिली. तसेच अमृता फडणवीस यांनी एका मुलाखतीत देवेंद्र फडणवीस हे 35 पुरणपोळ्या खात असल्याचे म्हटल्याचा दाखला दिला. त्यानंतर भाऊ कदम म्हणाले की, तुम्हाला 35 पोळ्या खा किंवा 40 पोळ्या खा. तुम्हाला हव्या असतील तेवढ्या पोळ्या आम्ही पोहच करू. त्यावेळी त्यांच्या हॉटेलचे नाव विचारले असता भाऊ कदम यांनी मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन असे सांगितले. त्यावर फडणवीस यांनी स्मित हास्य करत मी पुन्हा येईन मध्ये कधी कधी पाच वर्षे निघून जातात असे विधान केले. तर फ़डणवीस यांच्या या विधानावर सभागृहात एकच हशा पिकला.
त्यानंतर अभिनेते कुशल बद्रिके याने देवेंद्र फडणवीस यांना भेट म्हणून पेनड्राईव्ह दिला. त्यावेळी सभागृहात खसखस पिकली. त्यावेळी पेन ड्राईव्ह आणि फडणवीस यांचे नातं विशेष असल्याचे कुशल बद्रिके यांनी सांगितले. तर या पेनड्राईव्हमध्ये चला हवा येऊ द्या चे सगळे एपिसोड असल्याचे कुशल बद्रिके म्हणाले. त्यावरू फडणवीस म्हणाले की, मी दिलेल्या पेन ड्राईव्हमध्ये pain असतो तर तुम्ही दिलेल्या पेन ड्राईव्हमध्ये फक्त आनंद आहे. त्यामुळे हा महत्वाचा फरक दोन्ही पेन ड्राईव्हमध्ये असल्याचे फडणवीस यांनी यावेळी सांगितले.